महापालिका निवडणूक द्विसदस्यीय प्रणालीने होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:22+5:302021-06-18T04:10:22+5:30
अमरावती : २०२२ मध्ये होऊ घातलेली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक द्विसदस्यीय प्रणालीने होणार आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या नगरविकास विभागात वेगवान हालचाली ...
अमरावती : २०२२ मध्ये होऊ घातलेली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक द्विसदस्यीय प्रणालीने होणार आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या नगरविकास विभागात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापलिका एकसदस्यीय, तर अन्य महापालिकांच्या निवडणुका द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दौऱ्यावर असताना याबाबत सुतोवाच केले.
अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. एकूण ८७ सदस्यसंख्येपैकी भाजपचे ४५, युवा स्वाभिमान पक्ष ३, रिपाइं (आठवले गट) १ असे सत्तापक्षात ४९ नगरसेवक आहे. कॉंग्रेसचे १५, एमआयएम १०, शिवसेना ७, बसपा ७, तर अपक्ष एक असे विरोधी बाकांवरील बळ आहे. पाच स्वीकृत सदस्य आहेत.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नगरसेवक बनण्यास इच्छुकांना महापालिका निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याने ‘कही खुशी, कहीं गम’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. यापूर्वी अमरावती महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडली होती. यावेळी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी केंद्र व राज्यात भाजपची सत्ता होती. परिणामी भाजपला महापालिकेतही ८७ पैकी ४५ जागा जिंकता आल्या. युवा स्वाभिमान पार्टीने ३ व रिपाइं (आठवले गट) ने १ अशा चार नगरसेवकांची रसद पुरविली. गत पाच वर्षांत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्त्वाची पदे भाजपच्या वाट्यालाच होती. मात्र, आता राजकारण बदलले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने विकासकामांसाठीचा निधी राज्याकडून पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही. सत्ताधारी भाजप अमरावतीकरांचे प्रश्न, समस्या सोडविण्यात अपयशी ठरली, असा ठपका अनेकदा विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी ठेवला.
पुढील वर्षी होणारी अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय निवडणूक प्रणाली कोणत्या पक्षासाठी लाभदायक ठरते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, राजपत्र जाहीर झाल्यानंतरच निवडणूक हालचाली वेगवान होतील.
-------------
भाजप हा घराघरांत पाेहोचला आहे. संघटनात्मक रचना, बांधणी योग्यरीत्या झाली आहे. यापूर्वी राज्यात आणि आता केंद्रात भाजपचे शासन आहे. अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे. बहुसदस्यीय प्रणालीत जात, मनी, मसल पॉवर चालत नाही. ही प्रणाली भाजपसाठी लाभदायक ठरणारी आहे.
- तुषार भारतीय, पक्षनेता, भाजप.
--------------
द्विसदस्यीय प्रणालीची निवडणूक ही कॉंग्रेस पक्षासाठी पोषक आहे. काँग्रेसची उत्तम बांधणी सुरू आहे. बूथ कमिटी गठित झाल्या आहेत. वाॅर्डनिहाय दौरे करण्यात येतील. येत्या फेब्रुवारी २०२० मध्ये महापौर हा काँग्रेसचाच असेल.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता.