महापालिका कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:18 AM2017-07-21T00:18:13+5:302017-07-21T00:18:13+5:30
झोन क्र.२ मधील उपअभियंता सुहास चव्हाण यांना नगरसेविकेच्या मुलाने केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून
मारहाण प्रकरण : कर्मचाऱ्यांचा संप चर्चेनंतर संपुष्टात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : झोन क्र.२ मधील उपअभियंता सुहास चव्हाण यांना नगरसेविकेच्या मुलाने केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
१९ जुलैला चव्हाण यांना भाजपच्या नगरसेविका जयश्री डहाके यांचा मुलगा अंकुश डहाके याने मारहाण केली होती. त्याबाबत बुधवारीच डहाकेविरूद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, त्यानंतर अंकुश डहाकेला अटक करण्यासह जयश्री डहाके आणि नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. गुरूवारी तर आंदोलनकर्त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आमसभेवरच बहिष्कार घातला. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या राजकीय दडपणशाहीचा तीव्र निषेध केला.
उपायुक्तद्वय महेश देशमुख व नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, सहायक आयुक्त, योगेश पिठे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, पशूशल्य चिकित्सक सुधीर गावंडे, सचिन बोंद्रे, विधि अधिकारी श्रीकांत चव्हाण, सहायक आयुक्त मंगेश वाटाणे व सुनील पकडे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, दुर्गादास मिसाळ, अजय जाधव, प्रमोद येवतीकर यांच्यासह बांधकाम, उद्यान, कर, झोन कार्यालय व महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.