पालिका स्वच्छताग्रही

By admin | Published: June 25, 2017 12:08 AM2017-06-25T00:08:43+5:302017-06-25T00:08:43+5:30

महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला असून त्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे.

Municipal sanitary wing | पालिका स्वच्छताग्रही

पालिका स्वच्छताग्रही

Next

कॅरिबॅग वापरावरही बंदी : लोकसहभागाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला असून त्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे जागीच वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येक आस्थापनाधारकाने दोन डस्टबिन ठेवाव्यात तथा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग न हाताळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानणाऱ्या ५० पेक्षा अधिक व्यावसायिकांकडून अतापर्यंत ५०० ते ५ हजारांप्रमाणे सहा दिवसांत १ लाख १२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
राजकमल, जयस्तंभ, इतवारा, चित्रा, सरोज, गांधी चौक, नमुना, अंबापेठ, व्हीएमव्ही, गाडगेनगर, विलासनगर या व्यावसायिक क्षेत्रात ही कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अमरावती शहर २३१ व्या क्रमांकावर राहिले. ते यंदा किमान पहिल्या १०० च्या यादीत यावे, यासाठी आयुक्त हेमंत पवार, आरोग्य विभाग व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेकडे असलेले अल्प मनुष्यबळ, मशिनरीज आदींची कमतरता पाहता स्वच्छतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने समोर यावे, असे आवाहन प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी व्यावसायिक क्षेत्रातील आस्थापनांना डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. शहरातील बहुतांश हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालये खरकटे नालीत सोडून देतात. इतवारा बाजारात तर अस्वच्छतेचा कहर असतो. त्या अनुषंगाने डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे इतवारा बाजार व जवाहर रोडवर मोहीम राबविण्यात आली. इतवारा बाजारातील व्यावसायिक, भाजीविक्रेते, फळविक्रेते हे त्यांच्या व्यवसायातील कचरा, प्लास्टिक, भाजीपाला डस्टबिनमध्ये न टाकता नाल्यात, रस्त्यावर आणि दुकानाच्या बाहेर टाकत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदविले. काही ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यात. अशा दुकानदारांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक अरूण तिजारे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक धनंजय शिंदे, सिद्धार्थ गेडाम, प्रशांत गावनेर यांनी ही कारवाई केली.

कारवाईत सातत्य
१६ जूनला २८५०० रुपये,१७ ला १७ हजार रुपये,१९ ला २० हजार रुपये,२० ला १६,३०० रुपये,२१ ला १६,७०० आणि २२ जूनला १४,१०० असे एकूण १ लाख १२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई निरंतर सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी दिली.

आस्थापनेत डस्टबिन ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. डस्टबिन न ठेवणाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रूपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवरही दंड आकारण्यात येत आहे.
- हेमंत पवार, आयुक्त, मनपा.

Web Title: Municipal sanitary wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.