‘ईटकॉन्स’ला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:17 AM2021-08-21T04:17:03+5:302021-08-21T04:17:03+5:30
अमरावती : मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट सोपविलेल्या नोएडा येथील ईटकॉन्स प्रा. लि. एजन्सीने विना परवानगीने जाहिरात प्रकाशित केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी ...
अमरावती : मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट सोपविलेल्या नोएडा येथील ईटकॉन्स प्रा. लि. एजन्सीने विना परवानगीने जाहिरात प्रकाशित केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे ‘ईटकॉन्स’ प्रकाशझोतात आले आहे.
महापालिकेने ई-निविदाद्धारे शिक्षित, उच्च शिक्षित अशा विविध पदांवर कंत्राटी अधिकारी, कर्मचारी नियुक्तीसाठी २९५ मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट सोपविण्यात आला आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी विशेष सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अमानत रक्कम मागितल्याबाबत विशेष सभेत झालेला गाेंधळ आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आयुक्तांना नोटीस पाठविल्याने प्रशासन हैराण झाले आहे. ईटकॉन्स नियुक्त होताच महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, दरम्यान महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता ईटकॉन्स एजन्सीने जुने कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलीन नव्याने कंत्राटी कर्मचारी
नियुक्तीसाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित केली. ही बाब नियमबाह्य असल्याचा ठपका महापालिका प्रशासनाने ठेवला आहे.
याबाबत आयुक्त प्रशांत रोडे यांनी ईटकॉन्सच्या संचालकांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. आता महापालिका नोटीसला
एजन्सी कोणते उत्तर देते याकडे नजरा लागल्या आहेत.