हद्दीबाहेरच्या नागरिकांकडूनही पालिकेची करवसुली

By admin | Published: June 18, 2015 12:23 AM2015-06-18T00:23:39+5:302015-06-18T00:23:39+5:30

स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीत नसलेल्या कृषी कॉलनीतील रहिवाशांकडून गेल्या २१ वर्षांपासून पालिकेव्दारे कर वसूल ...

Municipal tax evasion from the outskirts of the area | हद्दीबाहेरच्या नागरिकांकडूनही पालिकेची करवसुली

हद्दीबाहेरच्या नागरिकांकडूनही पालिकेची करवसुली

Next

विकास मात्र शून्य : कृषी कॉलनीवासीयांची व्यथा
मोर्शी : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीत नसलेल्या कृषी कॉलनीतील रहिवाशांकडून गेल्या २१ वर्षांपासून पालिकेव्दारे कर वसूल केला जात आहे. हा परिसर पालिका क्षेत्रात समाविष्ट व्हावा, या मागणीकडे मात्र नगर परिषद दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या भागातील रहिवासी नागरी सुविधांपासून वंचित आहेत.
कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शासकीय कृषी कर्मचारी गृह निर्माण संस्था, मोर्शी या नावाने संस्था स्थापन करुन शेत सर्वे नंबर २०९/१ खरेदी केले. हा भाग दुर्गवाडा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्यामुळे दुर्गवाडा ग्रामपंचायतीकडून २३ एप्रिल १९८२ ला ग्रामपंचायतीकडून परवानगी प्राप्त करुन १९८५ मध्ये घरांचे बांधकाम पूर्ण केले.
१९८७ च्या राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार मोर्शी नगर परिषदेच्या नागरी क्षेत्रात वाढ करण्यात आली. तथापि कृषी कॉलनी परिसराचा त्यात समावेश करण्यात आला नाही. १९८८ मध्ये कृषी कॉलनीचा सर्वे नंबर २०९/१ नगर परिषदेच्या क्षेत्रात समाविष्ट करुन नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती खुद्द संस्थेने ठराव घेऊन नगर परिषदेकडे केली. १९९१ मध्ये सुध्दा अशीच विनंती करण्यात आली. मात्र, तरीही या परिसराचा समावेश नगरपरिषदेच्या हद्दीत करण्यात आला नाही. तरीही १९९४ पासून नगरपरिषदेने या कॉलनीतील नागरिकांकडून घरटॅक्स वसूल करणे सुरु केले.
२६ डिसेंबर २०१४ मध्ये माहितीच्या अधिकारात संबधित क्षेत्र नगरपरिषदेच्या हद्दीत येत नसल्याचे नपच्या माहिती अधिकाऱ्यांनी कृषी कॉलनी सहकारी संस्थेला कळविले. (तालुका प्रतिनिधी)

कराची रक्कम सव्याज परत होईल का?
नगर परिषदेच्या हद्दीत जो भागच येत नाही, त्या वसाहतीतील लोकांकडून घरटॅक्स वसूल करण्याचे धाडस मोर्शी नगरपरिषदेने गेल्या २१ वर्षापासून केलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन वसूल केलेल्या घरटॅक्सची रक्कम संबंधित नागरिकांना पालिका सव्याज परत करणार का? हा प्रश्नही येथे उपस्थित केला जात आहे. विशेष असे की, पालिकेच्या ताब्यातील पाणीपुरवठा योजनेचा पाण्याचा जलकुंभ आणि निर्जंतुकीकरण संयंत्राचा भाग सुध्दा नगर परिषदेच्या हद्दीत येत नसल्याची बाब कृषी कॉलनीतील रहिवासी बोलून दाखवित आहेत.

क्षेत्राबाहेर असल्यामुळे विकास माघारला!
या कॉलनीतील नागरिकांकडून एकीकडे पालिका करवसुली करीत असतानाच दुसरीकडे या परीसराच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या विनंत्यांकडे हे क्षेत्र नप हद्दीत येत नसल्याच्या सबबीखाली दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

कृषी कॉलनीचा परिसर नप हद्दीत येत नसताना गेल्या २१ वर्षांपासून नप कर वसूल करीत आहे. आतापर्यंत हा भाग नपमध्ये समाविष्ट का झाला नाही, याची चौकशी करुन पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करुन घेण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल.
-गीता ठाकरे
मुुख्याधिकारी, नगर परिषद, मोर्शी

Web Title: Municipal tax evasion from the outskirts of the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.