कामगार कार्यालयात धडकले महापालिकेचे पथक, बजावणार नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:47+5:302021-06-24T04:10:47+5:30
अमरावती : जिल्हा कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणासाठी सध्या कामगारांची तोबा गर्दी उसळली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच ...
अमरावती : जिल्हा कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणासाठी सध्या कामगारांची तोबा गर्दी उसळली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पथकाला बुधवारी तेथे पाठविले व या पथकाद्वारा नोटीस बजावण्यात येणार आहे, दरम्यान प्रशासकीय व तांत्रिक कारणाचा आधार घेत गुरुवारपासून नोंदणी काही कालावधीसाठी स्थगित करण्यात येत असल्याचे सहायक कामगार आयुक्तांनी जाहीर केले व तसा फलक कार्यालयासमोर लावला आहे.
जिल्हा कामगार कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण काही दिवसांपासून सुरू आहे. यासाठी कामगारांची गर्दी झाल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली होती. यासाठी रॅपिड अँन्टिजेनच्या टेस्ट करण्यात येत असल्याचे या विभागाने सांगितले. नोंदणीॅसाठी काही कामगार रात्रीपासून मुक्कामाला होते. ग्रामीणमधून वाहने भरून कामगार तेथे नोंदणीसाठी येत असल्याचे दिसून आले. या विभागाच्या नियोजनाअभावी सावळागोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र नियोजनाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाला दिल्याची माहिती आहे.
बॉक्स
ऑनलाईन अर्ज मंजूर, कामगारांच्या मोबाईलवर लिंक
तांत्रिक कारणांमुळे नोंदणी गुरुवारपासून तात्पुरत्या कालावधीसाठी बंद केल्याचा फलक तेथे लावलेला आहे. संकेतस्थळावर ज्या कामगारांची नोंदणी, नूतनीकरण अर्ज मंजूर करण्यात आले, त्यांनी नोंद केलेल्या भ्रमनध्वनीवर पाठविण्यात आलेली आहे. नोंदणी फी २५ रुपये व अंशदान फी १२ रुपये भरल्यानंतर ऑनलाईन नोंदणी क्रमांक प्राप्त होणार असल्याचे सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.