मनपाची दुमजली इमारत अतिक्रमितांच्या घशात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 11:04 PM2022-11-19T23:04:38+5:302022-11-19T23:05:38+5:30
राजापेठस्थित काठियावाड श्रीराम मंदिर परिसरात महापालिकेची सुस्थितीत असलेली दुमजली इमारत आहे. शाळा बंद झाल्यानंतर तेथे खासगी जिम उभारण्यात आला. तो जिम नंतर बंद पडला. कुण्या एका महिलेनेदेखील तेथील एक मजला ताब्यात घेतला होता. त्या अतिक्रमणाला एका तत्कालीन नगरसेवकाने बळ दिले होते. वर्षांपूर्वी बाजार परवाना विभागाचे कार्यालय तेथे आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणामुळे महापालिकेची राजापेठस्थित दुमजली इमारत अतिक्रमितांच्या घशात गेली आहे. ती बेवारस झाली आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील या इमारतीत काही वर्षांपूर्वी शाळा चालविली जात होती. मात्र, पाच ते सहा वर्षांपासून काही अनोळखी लोकांनी तेथे घुसखोरी केली आहे. त्या इमारतीच्या तळमजल्यावरील दोन ते तीन खोल्यांमध्ये काहींनी अनधिकृतपणे राहणे सुरू केले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने मूग गिळले आहे. संबंधित अधिकारी त्या अतिक्रमणांपासून ते अनभिज्ञ असल्याचा दावा करून नामानिराळे झाले आहेत.
राजापेठस्थित काठियावाड श्रीराम मंदिर परिसरात महापालिकेची सुस्थितीत असलेली दुमजली इमारत आहे. शाळा बंद झाल्यानंतर तेथे खासगी जिम उभारण्यात आला. तो जिम नंतर बंद पडला. कुण्या एका महिलेनेदेखील तेथील एक मजला ताब्यात घेतला होता. त्या अतिक्रमणाला एका तत्कालीन नगरसेवकाने बळ दिले होते. वर्षांपूर्वी बाजार परवाना विभागाचे कार्यालय तेथे आले. अलीकडे बाजार परवाना विभागाचे कार्यालय राजापेठ झोन कार्यालयात हलविण्यात आले. त्यामुळे ती इमारत आपल्या अखत्यारीत आहे, याचा मनपा प्रशासनाचा विसर पडला. त्यामुळे आता एका अतिक्रमणधारकाने तळमजल्यावरील संपूर्ण एक हॉल रहिवाशांसाठी ताब्यात घेतला आहे, तर मागील बाजू दुसऱ्या एका अनोळखी अतिक्रमणधारकाच्या कवेत अडकली आहे.
इमारतीत तूर्तास केवळ एक आधार अपडेट केंद्र तेवढे सुरू आहे. तेथील अतिक्रमणधारकच त्या इमारतीचे भक्षणकर्ते ठरले आहेत
असामाजिक तत्त्वांचा वावर
ही इमारत प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आंदणात दिल्याने तेथे रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. तेथे कुणीही हटकणारा नसल्याने संपूर्ण इमारत बेवारस बनली आहे. दुपारी, सायंकाळी व्यवसाय केला की, तीन ते चार हातगाड्या बिनदिक्कतपणे त्या आवारात ठेवल्या जातात. ते प्रशासनाच्या गावीही नाही.
शिक्षण विभागाचे प्रमुख अनभिज्ञ
शिक्षण विभागाची जबाबदारी असलेल्या सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, ते त्या इमारतीबाबतच अनभिज्ञ होते. मात्र, शिक्षण विभागाकडून माहिती घेतो, सोमवारी प्रत्यक्ष पाहणीदेखील करतो, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आवारात अनधिकृत पार्किंग
महापालिकेच्या या विस्तीर्ण इमारतीला भलेमोठे आवार आहे, तर सकाळपासून सायंकाळपर्यंत तेथे बाजूच्या संकुलात शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक दुचाकी लावल्या जातात. लगतच्या संकुलात येणाऱ्यांसाठी महापालिका इमारतीचे ते आवार हक्काचे पार्किंगस्थळ ठरले आहे. संकुलाशी संबंधित एक व्यक्ती दररोज सकाळी वाहने त्या इमारतीच्या आवारात लावण्याच्या सूचना देताना दृष्टीस पडतो.
जोपर्यंत त्या इमारतीत शाळा होती, तोपर्यंत विभागाचे लक्ष होते. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून तेथे शाळा भरविली जात नाही. त्यामुळे तेथे कोण राहतो, कुणी अतिक्रमण केले की कसे, याबाबत माहिती नाही. वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल.
- अब्दुल राजीक,
प्रभारी शिक्षणाधिकारी, महापालिका.