जुन्या वैमनस्यातून बळेगाव शिवारात हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:18+5:302021-08-25T04:18:18+5:30
परतवाडा : अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बळेगाव येथे सोमवारी सायंकाळी ४ वाजता तिघांनी लोखंडी पाईप व ...
परतवाडा : अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बळेगाव येथे सोमवारी सायंकाळी ४ वाजता तिघांनी लोखंडी पाईप व काठ्यांनी मारहाण करून एकाची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून मंगळवारी अचलपूर न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांच्या पथकाने चिखलदरा येथूनच दुसऱ्या फरार आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुकुंद उकर्डाजी गवई (४५, रा. बळेगाव) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास जुन्या वादावरून चुलतभाऊ प्रकाश आकाराम गवई (४३), पवन गजानन हरणे (२५, दोघे रा. बळेगाव) व चेतन वरठे (रा. अंचलवाडी) या तिघांनी लोखंडी पाईप, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. बळेगाव शिवारातील समाधान गवई यांच्या शेतात मुकुंद जखमी अवस्थेत पडून होता. पोलिसांना याची माहिती मिळताच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलगा रोहित गवईच्या फिर्यादीवरून
सरमसपुरा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलिमा सातव, जमादार संतुलाल भुसूम, संजय इंगळे, पंकज ठाकरे, सिद्धांत ढोले, पवन पवार, सूरज तांडीलकर व सहकारी करीत आहेत.
बॉक्स
दोघे पसार, २६ पर्यंत कोठडी
सरमसपुरा पोलिसांनी प्रकाश गवई आरोपीला अटक केली आहे. मंगळवारी अचलपूर न्यायालयात हजर केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पसार असलेल्या दोन आरोपींपैकी एकाला पोलीस पथकाने चिखलदरा येथूनच ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
बॉक्स
मृताविरुद्ध खुनाचा गुन्हा
पूर्ववैमनस्यातून हत्येची घटना घडली असली तरी मृत मुकुंद गवईविरुद्ध पथ्रोट पोलिसात खुनाचा, तर सरमसपुरा पोलिसात गंभीर मारहाणीचा भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत मुकुंद आणि आरोपी पवन हरणे चिखलदरा येथील एका हॉटेलात काम करीत होते.