सेंट्रिंग ठेकेदाराची मित्रानेच केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:11 AM2018-05-11T01:11:29+5:302018-05-11T01:11:29+5:30
तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर कार्यरत सेंट्रिंग ठेकेदार आलोककुमार यादव याचा मित्रानेच खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आर्थिक देवाणघेवाण व मान-अपमानावरून ही हत्या झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर कार्यरत सेंट्रिंग ठेकेदार आलोककुमार यादव याचा मित्रानेच खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आर्थिक देवाणघेवाण व मान-अपमानावरून ही हत्या झाली. कुलदीपकुमार यादवने वरूड पोलिसांना खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, दुसऱ्याची चौकशी सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, मृत आलोककुमार रमाकांत यादव (२८, रा. लालकुवा टिकरी जि. उन्नाव) हा या बांधकामावर सेंट्रिंग ठेकेदार होता. त्याच्या सोबतीला दोन युवक होते. ७ मे रोजी भूमिअभिलेख कार्यालयाच्या सेप्टिक टँकमधून त्याचा कुजलेला मृतदेह वरूड पोलिसांनी बाहेर काढला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी घटनास्थळी शवविच्छेदनादरम्यान डोक्यावर रॉडने मारल्याचे तर मानेवर चाकूने कापल्याचे अहवालात नमूद केले.
पोलिसी खाक्याने कुलदीपला केले बोलते
वरूड : पोलिसांनी मृत आलोककुमारचा साहाय्यक असलेला कुलदीपकुमार यादव नामक युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. तो, मृत आलोककुमार व अन्य सहकारी राहुलकुमार यादव हे एकाच गावचे. आलोककुमार त्यांना मदतनीस म्हणून वागणूक देत होता. काम करायचे नसेल, तर पैसे देऊन तुम्ही निघून जा, असेही त्याने या दोघांना बजावले होते. त्यामुळे राग अनावर होऊन कुलदीपकुमारने डोक्यावर रॉड मारून आलोककुमारला गंभीर जखमी केले व नंतर गळा कापून खून केला. यानंतर मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून देण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याचा सहकारी राहुलकुमार यादव यालासुद्धा पथकाने पकडून आणले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
वरूड पोलिसांनी कुलदीपकुमार यादव याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोरख दिवे, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, एएसआय सुरेश गावंडे, शशिकांत पोहरे, कॉन्स्टेबल श्रीकांत खानंदे, रविकांत धानोरकर, सचिन भाकरे, उमेश ढेवले, विक्रांत कोंडे करीत आहेत.