निर्घृण खून केला अन् मृतदेह फरफटत नेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 12:30 PM2021-12-09T12:30:02+5:302021-12-09T12:35:50+5:30
पंकज हा तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरामागील स्वतःकडील खताच्या गंजीवर लघुशंका करीत असताना राजेश ऊर्फ खन्ना याने मनाई केली. यातून त्यांचात वाद झाला होता, वाद निवळला तरी राजेशच्या मनात खुमखुमी कायम होती.
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली खुर्द येथे तीन दिवसांपूर्वी स्वत:कडील खताच्या गंजीवर लघुशंका करण्याची बाब युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याला लोखंडी ॲंगलने डोक्यावर वार करून ठार करण्यात आले.
पोलीस सूत्रांनुसार, पंकज जगत खंडारे (३५, रा. चिंचोली खुर्द) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी घराशेजारी राहणारा राजेश ऊर्फ खन्ना देविदास खंडारे (४५) याला रहिमापूर पोलिसांनी अटक केली. पंकज हा तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरामागील स्वतःकडील खताच्या गंजीवर लघुशंका करीत असताना राजेश ऊर्फ खन्ना याने मनाई केली. यातून त्यांचात वाद झाला होता, वाद निवळला तरी राजेशच्या मनात खुमखुमी कायम होती. ७ डिसेंबर रोजी पंकज कामावरून घरी आला. बाहेर निघाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर पंकजच्याच घरामागील जागेत राजेशने लोखंडी अँगलने त्याच्या डोक्यावर सपासप वार केले. या मारहाणीत पंकजचा डोके चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
कोसळलेल्या पंकजला राजेशने फरफटत गावानजीकच्या शहानूर नदीपात्रात नेले. या घटनेची माहिती कळताच पंकजची आई कोकिळाबाई खंडारे (५०) यांनी नदीपात्र गाठले. यावेळी पंकज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर मारेकरी राजेश ऊर्फ खन्ना त्याच्या शेजारी उभा होता. यानंतर राजेशने तेथून पळ काढला.
घटनेची माहिती रहिमापूर चिंचोली पोलीस ठाण्याला मिळताच ठाणेदार सचिन इंगळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पंकजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
पोलिसांनी आरोपी राजेशला शोधून रात्री दोन वाजता ताब्यात घेतले. कोकिळाबाई खंडारे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी गजानन वर्मा, नीलेश टोपे, गजानन शेरे, रवींद्र निंबाळकर, नागोराव जवळकर करीत आहेत.