तारखेड्यात धारदार शस्त्राने तरूणाचा खून; विविध दिशेने तपास, अज्ञाताविरूध्द गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: July 2, 2023 07:35 PM2023-07-02T19:35:15+5:302023-07-02T19:35:25+5:30
हाताला येईल ते काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला.
अमरावती: हाताला येईल ते काम करणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. १ जुलै रोजी रात्री १२ ते १२.१५ च्या सुमारास तारखेडा चौकात ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.
मनोज हिरालाल सोनी (३०, गणपती मंदिराजवळ, तारखेडा, अमरावती) असे मृताचे नाव आहे.
मनोजच्या खुनाचा गुंता सोडविण्यासाठी खोलापुरी गेट पोलिसांसह गुन्हे शाखा देखील सरसावली आहे. मात्र सायंकाळपर्यंत मनोजच्या खुनामागील कारण स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने सर्व शक्यतांंची पडताळणी करून तपास केला जात आहे. अलिकडे सिसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणारा मनोज विवाहित आहे.
शनिवारी रात्री १२ नंतर त्याच्या घराजवळील मंदिरानिजकच्या चौकात त्याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या पोटावर, छातीवर व हातावर वार करण्यात आल्याने तो तेथेच कोसळला. तो कोसळताच आरोपीने पळ काढला. तर दुसरीकडे मनोजला प्रथम जिल्हा सामान्य रूग्णालयात व पुढे खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्युची वार्ता कळताच भाजीबाजार, तारखेडा परिसरात खळबळ उडाली. खोलापुरी गेट पोलिसांनी दोन तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्रेमप्रकरण की विवाहबाह्य संबंध?
मनोजच्या हत्येनंतर पोलिसांनी दोन तीन शक्यतांची पडताळणी करून तपासाला वेग दिला आहे. प्रेमप्रकरण, विवाहबाह्य संबंध व जुने वैमनस्य अशा तीन आघाड्यांवर तपास केला जात आहे. पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनोजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी गाठले घटनास्थळ
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी देखील रविवारी घटनास्थळ गाठले. त्यानंतर खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिशानिर्देश दिलेत. पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड व पुनम पाटील , गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे यांनी देखील खोलापुरी गेट ठाण्यात सकाळपासून ठिय्या दिला. तेथील नवनियुक्त ठाणेदार रमेश ताले पुढील तपास करत आहेत. विशेष पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमलू व त्यांची टिम देखील खोलापुरी गेटमधील त्या खुनाचे धागेदोरे शोधण्यासाठी प्रयत्नशील दिसली.