पत्नीच्या ‘लिव्ह इन पार्टनर’चा खून; अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक
By प्रदीप भाकरे | Published: December 20, 2022 06:06 PM2022-12-20T18:06:11+5:302022-12-20T18:06:49+5:30
चांदुर रेल्वे तालुक्यातील राजना येथील घटना
अमरावती/ चांदूररेल्वे : पत्नीच्या लिव्ह इन पार्टनरचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चांदूररेल्वे तालुक्यातील राजणा येथे मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास उघड झाली. अमित नारायण उपाध्याय (३८, रा. सातेफळ, ता. चांदुररेल्वे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी चांदूररेल्वे पोलिसांनी राजना येथील एका व्यक्तीसह त्याच्या दोन तरूण मुलांना अवघ्या दोन तासात अटक केली.
अमित उपाध्याय व ४५ वर्षीय आरोपीच्या पत्नी यांच्यामध्ये एक वर्षांपासुन प्रेमसंबंध होते. ती महिला ही एक वर्षांपासून अमितसोबत राहत असल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी पितापुत्रांनी संगणमताने त्याचा खून केल्याची माहिती चांदूररेल्वे पोलिसांनी दिली. एक अनोळखी इसम रक्ताच्या थारोळयामध्ये मरुन पडला असल्याची माहिती राजना येथील पोलीस पाटलाने चांदूररेल्वे पोलिसांना दिली. चौकशीअंती मृताची अमित नारायण उपाध्याय अशी ओळख पटविण्यात आली. तर, दुसरीकडे अमितच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनुसार, अमित हा २० डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास आरोपींच्या घरी राजणा येथे गेला. त्यावेळी त्यांचा वाद विवाद झाला. तो वाद विकोपाला जावून ४५ वर्षीय आरोपीसह त्याच्या २० व १९ वर्षे वयाच्या दोन मुलांनी त्याला दगड व बांबुच्या काठयांनी मारहाण करुन ठार मारले. खून केल्यानंतर सर्व आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना राजना येथुन अटक करण्यात आली. एसपी अविनाश बारगळ, एसडीपीओ जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात चांदुर रेल्वेचे ठाणेदार सुनिल किनगे, सहायक पोलीस निरिक्षक अनिल पवार व मनोज सुरवाडे, अंमलदार संतोष मोरे, अरविंद गिरी, रवि भुताडे, योगेश नेवारे, चांदु गाडे यांनी ही कारवाई केली.
अमित उपाध्याय व प्रौढ आरोपीची पत्नी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. ती महिला एक वर्षांपासून अमितसोबत राहत असल्याने आरोपींनी त्याचा राग मनात धरुन संगणमताने अमितचा खून केला. तीनही आरोपींना अटक केली.
- सुनील किनगे, ठाणेदार, चांदुररेल्वे