पूर्ववैमनस्यातून लांडी येथे वृद्धाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:55+5:302021-02-08T04:12:55+5:30
खल्लार : नजीकच्या लांडी येथील आपसी व जुन्या वादातून एका ७८ वर्षीय इसमाची काठीने मारहाण करून हत्या करण्यात ...
खल्लार : नजीकच्या लांडी येथील आपसी व जुन्या वादातून एका ७८ वर्षीय इसमाची काठीने मारहाण करून हत्या करण्यात आली. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अण्णाजी उत्तमराव इंगळे (७८, लांडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी मोहन विक्रम इंगळे (५८, रा. लांडी) याचेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलीस सूत्रानुसार, आरोपी व मृत हे दोघेही लांडी गावात शेजारी राहतात दोघेही एकाच कुटुंबातील असून त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून जागेचा वाद सुरू होता.
६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अण्णाजी इंगळे हे शेतातून घरी जात असताना आरोपी मोहन इंगळे याने अण्णाजी इंगळे यांना लांडी फाटा ते गावादरम्यान एका शेताजवळ काठीने जबर मारहाण केली व तिथून निघून गेला. सायंकाळी सहा वाजता शेतमालकाच्या नजरेस ही बाब पडली. अण्णाजी इंगळे उपचारार्थ चंद्रपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे पोहचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेची तक्रार आबाराव इंगळे यांनी खल्लार पोलिसांत दाखल केली. ठाणेदार विनायक लंबे यांच्यासह दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे, जमादार अशोक सावरकर, राजु विधळे, कोहळे, सिडाम, राजु व्यवहारे, संतोष राठोड, संजय गायकवाड, शाकिर शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आरोपी मोहन इंगळे विरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.