गटविकास अधिकारीपदाची संगीतखुर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:57+5:302021-09-26T04:13:57+5:30
चांदूर बाजार पंचायत समिती, २० दिवसांमध्ये चार बीडीओंची खांदेपालट चांदूर बाजार : स्थानिक पंचायत समितीत २० दिवसांमध्ये चार गटविकास ...
चांदूर बाजार पंचायत समिती, २० दिवसांमध्ये चार बीडीओंची खांदेपालट
चांदूर बाजार : स्थानिक पंचायत समितीत २० दिवसांमध्ये चार गटविकास अधिकारी बदलले. यामुळे चांदूर बाजार पंचायत समितीत गटविकास अधिकारीपदाचा जणू संगीतखुर्चीचा खेळ चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
चांदूर बाजार पंचायत समिती यंदा गटविकास अधिकाऱ्यांच्या खांदेपालटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. चार वर्षांपासून पंचायत समितीचा कारभार पाहणारे गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे यांची बदली २ सप्टेंबर रोजी झाली होती. त्यांचा जागी दर्यापूर येथील गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांना प्रभार देण्यात आला. आठवडा लोटत नाही तोच त्यांचा प्रभार काढून दर्यापूर येथीलच एबीडीओ सुधीर अरबट यांना देण्यात आला. गटविकास अधिकारी सुधीर अरबट प्रभार सांभाळत नाही तोच त्यांची बदली झाल्याचे पत्र झळकले. त्यांत्याकडील प्रभार काढून लगेच दुसऱ्या दिवशी भातकुली येथील एबीडीओ संजय काळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे स्थानिक पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारीपदाच्या खुर्चीकरिता जणू संगीत खुर्चीचा खेळ सुरू असल्याचे चर्चा तालुकाभर सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या झटपट बदलीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पंचायत राज कमिटीचा दौऱ्यात पंचायत समितीतील घबाड आपल्या माथी मारले जाऊ नये, याकरिता अधिकारी येथे काम करण्यास उत्सुक नसल्याचीही चर्चा कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमधून पुढे येत आहे.
--------------
बिलांची जुळवाजुळव
पंचायत राज समितीच्या अनुषंगाने जुन्या धूळ खात असलेल्या फायलींवरील धूळ झटकून उघडून पाहिल्या जात आहेत. अनेक अपूर्ण कामाच्या फायली पूर्ण केल्या जात आहेत. हीच धावपळ ग्रामपंचायतींमध्येसुद्धा दिसून येत आहे. ग्रामपंचायतींमधून खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जोडण्यासाठी बिलांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
-------------
निर्णायकी सैन्याचा लढा
प्रभारी अधिकाऱ्यांना कार्यालयातील परिपूर्ण माहितीसुद्धा नसते व कर्मचाऱ्यांवरसुद्धा पाहिजे तसा वचकही अल्प कालावधीत निर्माण होऊ शकत नाही. पीआरसी दौऱ्याच्या तोंडावर पंचायत समितीचा निर्णायकी लढा सुरू आहे.