माय-लेकींना वरून सख्खे भाऊ बनले साडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:10+5:302021-04-14T04:13:10+5:30
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : आईने मोठ्याशी, तर मुलीने धाकट्याशी प्रेमप्रकरण जुळवून लग्न केले. माय-लेकी सख्ख्या जावा झाल्या आणि ...
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : आईने मोठ्याशी, तर मुलीने धाकट्याशी प्रेमप्रकरण जुळवून लग्न केले. माय-लेकी सख्ख्या जावा झाल्या आणि दोन्ही सख्खे भाऊ साडू झाले. हा प्रकार काही वर्षे कुटुंबापासून दूर राहत असलेल्या मुलीच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर ते पोलीस ठाण्यात धडकले. अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नात्यांना काळिमा फासणारा हा प्रसंग धामणगाव रेल्वे तालुक्यातील एका गावात उघडकीस आला.
पती मद्याच्या अधीन झाल्यामुळे त्याच्यापासून दूर होत एक महिला आठ वर्षापूर्वी एकुलत्या मुलीला घेऊन माहेरी परतली. आईच्या आधाराने तिने गुजराण केली. मुलगीही मोठी होत होती.
लेकीच्या लग्नाचे स्वप्न प्रत्येक आईच्या मनी वसत असते. मात्र, तिचा स्वत:चा संसारही थाटावा, अशी इच्छा महिलेच्या मनात घोळत होती. त्यामुळे सदर महिलेने वेगळेच नाट्य गुंफले. तिने एका गावातील दोघा भावांना गाठले. आपली वृद्ध आई ही मामी, तर मुलगी व ती या सख्या बहिणी असल्याचे भासविले. दोन्ही बहिणी एकाच घरात नांदणार असल्याचे समजून त्या युवकांनाही आनंद झाला. दोघांना प्रेमजाळ्यात ओढत २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आईने मोठ्यासोबत, तर अल्पवयीन असलेल्या मुलीने धाकट्यासोबत एकाच दिवशी लग्न केले.
आई-मुलीने सख्ख्या जावा म्हणून दीड महिने संसार केला. यादरम्यान ही बाब वडिलाला माहीत होताच त्याची दारूची धुंदी एका क्षणात उतरली आणि तो थेट तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात पोहोचला. ठाणेदार अजय आखरे व बिट जमादार महादेव पोकळे यांनी घटनेचा तपास केला. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले व विधिज्ञ सीमा भाकरे यांना पाचारण करण्यात आले, मुलगी ही अल्पवयीन असल्याने ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून तिच्याशी विवाह करणाऱ्या युवकाविरुद्ध बाल संरक्षण कायदा अंतर्गत पोक्सो दाखल करण्यात आला.