‘माझी कन्या भाग्यश्री’, अनेक बदलानंतर लागू
By admin | Published: February 28, 2017 12:19 AM2017-02-28T00:19:08+5:302017-02-28T00:19:08+5:30
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी योजना : गावासह बीपीएल कुटुंबांना लाभ
अमरावती : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे. आता योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या निकषासह राबविण्याचा निर्णय २२ फेब्रुवारीला आरोग्य विभागाने घेतला. मुलींचा जन्मदर अधिक असलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच बीपीएल कुटुंबासह असा सर्वसामान्य कुटुंबातील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या शिक्षणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन मदत करते, ही योजना ‘सुकन्या’ नावाने १ जानेवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे यात बदल व काही निकषामध्ये सुधारणा करून २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वीच थांबविण्यात आली होती. आता मात्र योजनेच्या अनेक निकषात बदल करून ही योजना २२ फेब्रुवारीपासून राज्यात लागू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासह सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य यात सुधारणा करणे, बालिका भू्रणहत्या रोखणे, मुलींच्या जन्मदराबाबत, समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे, मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे आदींसाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सरकारला यशदेखील येत आहे. मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना नव्या रुपात अंमलात आणली जाणार आहे.
आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे गावागावांमध्ये मुलांपेक्षा मुलींचा टक्का वाढविण्यास मदत होणार आहे व मुलींचे प्रमाण ज्या गावात अधिक राहणार आहे, त्या गावांचा आरोग्य विभागाद्वारा गौरव करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आता पुढील आर्थिक वर्षापासून मिळणार आहे. (प्रतिनिधी)
१८ वर्षांनंतर मुलींना मिळणार एक लाख
या योजनेंतर्गत एक वर्षाच्या आत आरोग्य विभागाद्वारा २१ हजार २०० रुपये मुलीच्या नावे गुंतविणार आहे व मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबवावी, यासाठी संबंधित ग्रामपंचयतीला सरकार प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहे. ज्या गावात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण असेल, त्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. मुलीस मिळणाऱ्या एक लाखापैकी १० हजार रुपये मुलीच्या शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक आहे.
एपीएल, बीपीएल कुटुंबात दोन मुलीपर्यंत लाभ
या योजनेचा एपीएल व बीपीएल कुटुंबामध्ये पहिल्या दोन मुलींपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तिसऱ्या अपत्यासाठी हा लाभ देय नाही. मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.
दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्यक
पहिल्या मुलीसाठी लाभ घेताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक नाही. मात्र, दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी पालकांना हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही योजना आधारशी जोडण्यात येणार आहे. तसेच बालगृहातील अनाथ मुलींसाठीही लागू आहे. मुलीचा १८ वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास योजनेचा फायदा तिच्या पालकांना मिळणार नसून, बँक खात्यात जमा होणारी रक्कम शासनजमा करण्यात येणार आहे.