माय-लेकीला मारहाण, विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:38+5:302021-06-10T04:10:38+5:30
वरूड : तालुक्यातील घोराड येथे एका महिलेने चार एकर शेताच्या वाहितीचे गतवर्षीचे शिल्लक पैसे मागताच प्रणव कडू नामक वाहितदाराने ...
वरूड : तालुक्यातील घोराड येथे एका महिलेने चार एकर शेताच्या वाहितीचे गतवर्षीचे शिल्लक पैसे मागताच प्रणव कडू नामक वाहितदाराने शेतमालक महिलेच्या मुलीला शेतात मारहाण केली व महिलेचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी वाहितदार युवकाविरुद्ध गुन्हे दाखल केले.
पोलीस सूत्रानुसार, आरोपीचे नाव प्रणव सुरेश कडू (३६, रा. घोराड) आहे. एका राजकीय पक्षाचा तो तालुकाप्रमुख आहे. शेतकरी महिलेचे घोराड शिवारात चार एकर शेतजमीन आहे. सहा वर्षांपासून प्रणव कडू हा एकरी १० हजार रुपयांप्रमाणे ती जमीन वाहितो. गतवर्षीचे ३० हजार रुपये वारंवार मागूनही त्याने दिले नसल्याने यावर्षी स्वतः शेती करण्याचे महिलेने ठरविले होते. परंतु, चार-पाच दिवसांपूर्वी प्रणवने फिर्यादीच्या शेतात वखरणी केल्याची माहिती मिळाली. यावरून मुलगी आणि तिची आई मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता शेतात पोहचल्या. तुम्हाला वावरात यायचा अधिकार नाही. पुन्हा आल्यास पेटवून टाकेन, असे म्हणत त्याने दोघींना धक्काबुक्की केली आणि खाली पाडले. यानंतर काठीने जबर मारहाण केली. मुलीच्या चुलत भावाने येऊन जखमी मायलेकींना ऑटोरिक्षात वरूड पोलीस ठाण्यात आणले. प्रणव कडू याच्याविरुद्ध मुलीने फिर्याद दिली. वरूड पोलिसांनी वाहितदाराविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस वैशाली सरवटकरसह वरूड पोलीस करीत आहेत.