माझ्या भेटीने 'त्यांना' का उठावे पोटशूळ ?
By admin | Published: June 18, 2015 12:25 AM2015-06-18T00:25:32+5:302015-06-18T00:25:32+5:30
जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मी भेट घेतली.
रावसाहेब शेखावत : मिसाईल कारखान्यासाठी राजनाथसिंहांशी भेट
अमरावती : जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मी भेट घेतली. या भेटीचा अन्वयार्थ राजकीय बदलांशी लावला जात आहे. तथापि, काँग्रेसशी आमच्या घराण्याची कायम निष्ठा आहे. मी कुणाची भफट घेतली असेल तर काहींनी पोटशूळ का उठावे, असा सवाल आमदार रावसाहेब शेखावत यांनी उपस्थित केला.
राजनाथसिंह यांच्याशी घेतलेल्या भेटीचा राजकीय अन्वयार्थ लावला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ते 'लोकमत'शी बोलत होते.
देश व राज्यात भाजपचे शासन आहे. विकास कामांसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपकडे जाऊ नये, असा नियम नाही. मी आमदार नसलो तरी माझ्या कारकिर्दीत मुहूर्तमेढ रोवलेली कामे व्हावीत यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. त्यासाठी मंत्र्यांची भेट घेणे, रखडलेल्या कामांना गती देण्यासाठीचा आग्रह धरणे हा माझ्या कार्यशैलीचा भाग आहे. सत्तेत नसतानाही मी विकासकामांसाठी आग्रही असतो त्यामुळेच काहींची आता धडधड वाढली आहे. माझ्या पक्षांतराच्या वावड्या हा त्याच भितीपोटीचा परिणाम होय, अशा शब्दांत रावसाहेबांनी त्यांच्या पक्षांतराच्या बातम्या पसरविणाऱ्यांवर निशाना साधला.
देशात काँग्रेसचे शासन असताना भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या नेत्यांकडे येवून विकास कामांसाठी आग्रह धरायचे. त्यामुळे भाजपचे नेते काँग्रेसवासी होताहेत, अशी चर्चा केली जात नव्हती. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकारामुळेच अमरावतीत विमानरोधक मिसाईल निर्मिती कारखान्याची पायाभरणी करण्यात आली. माझ्या मातोश्रींमुळे अमरावतीच्या वाट्याला आलेल्या या महत्त्वाकांक्षी उद्योगाला मूर्त रूप मिळावे यासाठी मी भाजप सरकारच्या प्रभावी मंत्र्याची भेट घेतली. बडनेऱ्याचा रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना आणि पंचतारांकित एमआयडीसीत नव्या उद्योगांना चालना या मुद्यांवरही चर्चा झाली. सत्ता बदलत असली तरी विकासकामांसाठी कार्यरत राहणे हे नेत्यांचे कर्तव्यच आहे. मी तेच पार पाडले. त्यासाठी इतका कांगावा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांना केला. (प्रतिनिधी)
आमच्या मनातही नाही, त्यांना स्वप्ने का पडावीत?
शेखावत कटुंबीयांनी कॉग्रेसची साथ कधीही सोडली नाही. काँग्रेसशी आम्ही जी निष्ठा बाळगली त्याची वेगळी पावती देण्याची गरज आहे काय? काँग्रेसमुळेच प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्यात. त्यांच्या रुपाने अमरावतीलाही हा मान प्राप्त होऊ शकला. सत्तेसाठी पक्षांतर हा विचारही आम्हाला शिवत नसताना 'काही मोजक्या' मंडळींनाच त्याबाबत स्वप्ने का पडतात, हा संशोधनाचा खरा विषय असल्याची मल्लीनाथी रावसाहेबांनी केली.