‘नॅक’ साहित्य खरेदी चौकशी अहवाल गुंडाळला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:05 PM2018-11-21T22:05:21+5:302018-11-21T22:06:01+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘नॅक’ समिती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात आलेल्या साहित्य, वस्तूंमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘नॅक’ समिती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात आलेल्या साहित्य, वस्तूंमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याअनुषंगाने कुलगुरूंच्या आदेशान्वये चौकशी समितीचे गठण झाले. मात्र, दोन वर्षांपासून चौकशी समितीकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी होणाºया सिनेटमध्ये या मुद्द्यावर घमासान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मार्च २०१८ रोजी झालेल्या सिनेट सभेत प्रवीण रघुवंशी यांनी विद्यापीठात ‘नॅक’ समिती दौºयात बेमालूमपणे खर्च झाल्याप्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. ३१ मार्च २०१५ रोजी विद्यापीठ कोषामध्ये सामान्य निधीत १७ कोटी शिल्लक होते, तर ३१ मार्च २०१७ रोजी सामान्य निधीत ८४ लाख १७ हजार ३६१ रुपये शिल्लक राहिले. ३१ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत शिल्लक निधी १७ कोटींवरून ८४ लाखांवर कसा आला? विद्यापीठात साधारण निधीत जमा होणारी रक्कम ही विद्यार्थ्यांच्या शुल्कातून येत असते. विद्यापीठाने सामान्य निधीतून दीड कोटी रुपये कसे खर्च केले, याबाबत चर्चा झाली.
दरम्यान, लेखा विभागाने अधिसभेत सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ‘नॅक’करिता आठ कोटी रुपये विद्यापीठाने साधारण निधीतून खर्च केल्याची बाब निदर्शनास आली. प्रवीण रघुवंशी यांनी सामान्य निधीतून ८.५० कोटी रुपयांच्या खर्चावर आक्षेप नोंदविला. दरम्यान, ‘नॅक’ खर्चाच्या अनियमितेबाबत प्राधिकरणांकडे तक्रार झाली काय, सन २०१६ मध्ये गठित समितीचा प्रवास कसा झाला, अशा विविध प्रश्नांवर प्रवीण रघुवंशी, दीपक धोटे, संतोष ठाकरे, विवेक देशमुख यांनी मते नोंदविली. चौकशी समिती गठित झाली असताना अहवाल गेला कुठे, याबाबत खुलाशाची मागणी झाली.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ३० मार्च २०१६ रोजी ‘नॅक’ समिती दौºयात साहित्य, वस्तू खरेदीबाबत एफ.सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीचा अहवाल तीन महिन्यांच्या आत सादर करण्यात येईल, असा निर्णय घेतला. मात्र, चौकशी समितीला सात महिने लोटले असतानासुद्धा अहवाल प्राप्त झालेला नाही, हे विशेष.
सर्व सिनेट सदस्यांना ‘नॅक’ खरेदी समितीचा चौकशी अहवाल देणे अपेक्षित होते. अद्याप तो मिळाला नाही. २४ नोव्हेंबर रोजी होणाºया सिनेट सभेत यासंदर्भात पुन्हा लक्षवेधी मांडली जाईल.
- प्रवीण रघुवंशी
सिनेट सदस्य, विद्यापीठ.