पदवी प्रमाणपत्रे मिळणार ‘नॅड’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:36 AM2018-10-05T01:36:12+5:302018-10-05T01:36:42+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ‘नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी’ या केंद्रीय अनुदान आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ‘नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी’ या केंद्रीय अनुदान आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठात ३४ व्या दीक्षांत समारंभात प्रदान केलेली सुमारे २२ हजारांपेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे अपलोड केली आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणत्रासाठी विद्यापीठात येण्याची गरज भासणार नाही, हे विशेष.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाने सीडीएसएल व्हेन्चर लिमिटेड या कंपनासोबत करार केला आहे. नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी या यूजीसीच्या संकेत स्थळावर सर्व परीक्षांची सर्व विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे आॅनलाइन उपलब्ध झाल्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणावरून ती सहजतेने पाहता येतील आणि डाऊनलोड करून पदवी प्रमाणपत्राची प्रिंटदेखील काढू शकतील, अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जे विद्यार्थी खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या पदवी प्रमाणपत्र पडताळण्याची गरज भासते. या प्रक्रियेला आॅफलाइनद्वारे बराच वेळ लागतो. मात्र, आता आॅनलाइनने पदवी प्रमापत्राची पडताळणी कमी वेळेत होणे शक्य झाले आहे. नव्या प्रणालीत प्रथमत: विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पाहण्यासाठी ‘नॅड’च्या संकेत स्तळावर नोंदणी करावी लागेल. याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील आॅनलाइन सर्व्हिसेस या विंडोवर उपलब्ध आहे. विद्यापीठ क्षेत्रातील संबंधित विद्यार्थ्यांनी ३४ व्या दीक्षांत समारंभामध्ये प्रदान करण्यात आलेली पदवी प्रमाणपत्रे आॅनलाइन उपलब्ध असल्यामुळे ती त्यांना नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरीवरून केव्हाही काढता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी केले.
पहिल्या टप्प्यात पदवी प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींशी निगडीत सर्व आवश्यक कागदपत्रे ‘नॅड’वर उपलब्ध करून दिले जातील.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू