नाफेडचे टार्गेट पूर्ण? डीएमओच्या हरभरा खरेदी केंद्रांना टाळे, हरभरा उत्पादक संतापले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 17, 2023 03:59 PM2023-04-17T15:59:47+5:302023-04-17T16:03:48+5:30
व्हीसीएमएफसह अन्य संस्थांच्या खरेदीची मंद गती
अमरावती : खासगी हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची धाव नाफेडच्या केंद्रांकडे आहे. याकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी कित्येक तास रांगेत राहावे लागले. आता सोमवारपासून डीएमओच्या केंद्रांवर खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. टार्गेट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आल्याचे डीएमओंनी सांगितले.
नाफेडच्या केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीपासूनच शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. सुरुवातीला नोंदणीसाठी रांगा, त्यामध्ये झालेला गोंधळ व त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात नोंदणी असा प्रकार होता. यामध्ये मुदतीपर्यंत डीएमओ १८५४३ व व्हीसीएमएफकडे १७,५८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचे तुलनेत ५० टक्केच शेतकऱ्यांची खरेदी झालेली असतांना आता केंद्राला टाळे लागल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चिडले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी हरभऱ्याचे उच्चांकी दीड लाख हेक्टर क्षेत्र होते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जमिनीत आद्रर्ता चांगली होती. ती रब्बीच्या हरभऱ्यासाठी पोषक ठरली. त्यामुळे यंदा हरभऱ्याची क्षेत्रवाढ झाली. सरासरी उत्पन्नही चांगल्या प्रकारे झाले. प्रत्यक्षात वर्षभऱ्यापासून हरभऱ्याला भाव साडेचार ते साडेपाच हजारांवर स्थिरावला आहे. शासनाने यंदा ५३३५ हमिभाव जाहीर केलेला असतांनाही त्याचे आतच खासगीमध्ये खरेदी होत असल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे नाफेडकडे धाव असतांना अचानक केंद्र बंद असल्याने शेतकरी संतापले आहे.