नगरपंचायत निवडणूक पराभूत उमेदवारांची मतदारांकडून वसुली
By admin | Published: November 5, 2015 12:16 AM2015-11-05T00:16:12+5:302015-11-05T00:16:12+5:30
नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात.
मत दिले नाही, भेट वस्तू परत करा !
अमरावती : नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात. मात्र , मतदान दुसऱ्याच उमेदवाराला केले. मतदारांनी दिलेल्या या चकम्यामुळे पराभूत उमेदवार या भेटवस्तू परत मागत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी या भेटवस्तू मतदारांना दिल्यात तेच कार्यकर्ते तुम्ही ‘त्या’ उमेदवाराला मत दिले नाही ना? आता भेटवस्तू परत करा, असे सुनावताना दिसत आहेत. यामध्ये त्या मतदारांची मात्र अडचण झाली आहे.
जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार नगरपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झालेत.
मतदारांनी उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता मतदान केले. मात्र, काही मतदार उमेदवारांनी दिलेल्या आमिषाला बळी पडले. त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या. प्रत्यक्षात निकालानंतर उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या पाहता भेटवस्तू व मतांच्या संख्येचा ताळमेळच जुळत नाही.
चर्चेवर झाले शिक्कामोर्तब
अमरावती : अवाढव्य खर्च करुनही पदरी आलेला पराभव जिव्हारी लागल्याने या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच त्याच सायंकाळपासून भेटवस्तू परत मागण्याचा सपाटा लावला आहे.
तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापित झाल्यानंतर काही उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले होते. निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच त्यांनी घरोघरी भेटी देण्याचा सपाटा लावला होता.
प्रचाराच्या अखेरच्या दिवसांत काही मतदारांना भेटवस्तू दिल्याची चर्चा होती. मात्र, आता भेटवस्तू परत मागण्याचा प्रकार समोर आल्याने मतदारांना आमिष व भेटवस्तू दिल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.