नागपूर-अमरावती पॅसेंजर गाडीला धोकादायक थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:20 PM2020-02-08T12:20:05+5:302020-02-08T12:21:56+5:30
एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मेमू पॅसेंजर या रेल्वे गाडीला बडनेऱ्यात थांबा नसल्याने ही गाडी आऊटरला थांबते. नाइलाजास्तव प्रवासी तेथूनच गाडीखाली उतरून बडनेरा स्थानक गाठतात. हा थांबा प्रवाशांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी धोकादायक झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मेमू पॅसेंजर या रेल्वे गाडीला बडनेऱ्यात थांबा नसल्याने ही गाडी आऊटरला थांबते. नाइलाजास्तव प्रवासी तेथूनच गाडीखाली उतरून बडनेरा स्थानक गाठतात. हा थांबा प्रवाशांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी धोकादायक झाला आहे. हा थांबा बंद करून रेल्वे गाडी बडनेरा स्थानकात न्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुंबईत धावणाऱ्या लोकलचा चेहरामोहरा असणाऱ्या अमरावती ते नागपूर प्रवास करणाऱ्या मेमू गाडीला एक महिन्यापूर्वी हिरवा कंदील दाखविण्यात आला. मात्र, ही गाडी कॉड लाइनने जात असल्याने बडनेरा रेल्वे स्थानकावर येत नाही. बडनेऱ्यातून मोठा प्रवासी वर्ग या गाडीला आहे. जवळपास दोनशे प्रवासी मेमू गाडीतून बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आउटरला उतरतात. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचा अधिकृत थांबा नाही. उतरणारे सर्व प्रवासी रेल्वे रुळाच्या बाजूने बडनेरा स्थानकावर पोहचतात. हा प्रकार प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजीचा सूर आहे. ही गाडी थेट बडनेरा रेल्वे स्थानकावर आणावी आणि प्रवासी उतरल्यानंतर अमरावतीसाठी रवाना करण्यात यावे. खासदार नवनीत राणा यांनी या समस्येकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
मेमू आता आठ डब्यांची
अमरावती ते नागपूर मेमू पॅसेंजर जेव्हा सुरू झाली तेव्हा तिला १६ डबे होते. या रेल्वे गाडीला मोठा प्रवासी वर्ग आहे. या मार्गात प्रत्येक स्थानकावर ती थांबते. माफक तिकीट दर असल्याने प्रवाशांची तिला पसंती आहे. मात्र, एकाएकी या गाडीचे आठ डबे कमी करण्यात आले. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या गाडीला सोळा डबे ठेवण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.