अमरावती विद्यापीठ अधिसभेवर पुन्हा ‘नुटा’राज; ३६ पैकी २२ जागा काबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 10:29 AM2022-11-24T10:29:47+5:302022-11-24T10:30:02+5:30
शिक्षण मंच, एबीव्हीपीचे आठ जागांवर वर्चस्व
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या अधिसभेवर पुन्हा नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा)ने वर्चस्व सिद्ध केले. ३९ अधिसभा सदस्यांपैकी ३६ सदस्यांकरिता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नुटा २२ जागांवर, पाच जागांवर शिक्षण मंच, तीन जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. नुटाचे दोन सदस्य आधीच बिनविरोध झाले.
विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळासाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग व ज्ञानस्रोत अभ्यासिका याठिकाणी मतमोजणीच्या कामाला सुरुवात झाली. अखेर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा)ने शिक्षण मंचचा दारुण पराभव केला. या विजयानंतर नुटाच्या सर्व विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
मतमोजणीच्या कामासाठी शिक्षण विभागप्रमुख डॉ. गजानन गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीत बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख प्रसाद वाडेगावकर, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख यादवकुमार मावळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रणव कोलते, केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख ए. एल. राठोड यांचा समावेश होता. निर्वाचन अधिकारी म्हणून कुलसचिव तुषार देशमुख यांनी संपूर्ण जबाबदारी सांभाळली.
मतदारसंंघनिहाय निकाल
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एकूण ३९ अधिसभा सदस्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होती. यामध्ये १० प्राचार्य संवर्गामध्ये सात जागांवर नुटा, दोन जागांवर शिक्षण मंच विजयी झाला, तर एसटी प्रवर्गाच्या जागेवर उमेदवारच मिळाला नाही. १० महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये आठ जागांवर नुटा, तर एका जागेवर शिक्षण मंच आणि एक अपक्ष, सहा विद्या परिषदेसाठी चार नुटा, दोन जागांवर शिक्षण मंचचे उमेदवार विजयी झाले आहेत.
पाच जागांवरील मतमोजणी थांबवली
विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील दहा पदवीधर मतदारसंघांत पाच जागांवरील निकाल जाहीर झाला. यामध्ये महिला वर्गवारीतून मयूरी जवंजाळ, एससी प्रवर्गातून प्रताप अभ्यंकर, एसटी प्रवर्गातून रितेश खुलसाम, डीट/ एनटी कैलाश चव्हाण, ओबीसी वर्गवारीतून भय्यासाहेब उपाख्य, विद्याधर मेटकर विजयी झाले आहेत, तर उर्वरित पाच जागांवरील मतमोजणी थांबविण्यात आली. आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता पुन्हा मतमोजणी सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.