हातचलाखीने दागिने पळविणारी नागपुरकर टोळी गजाआड; आरोपींत तीन महिलांचा समावेश

By प्रदीप भाकरे | Published: February 1, 2023 05:03 PM2023-02-01T17:03:09+5:302023-02-01T17:03:34+5:30

सराफा दुकाने केली होती लक्ष्य, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nagpurkar gang arrested for smuggling jewels; Three women are among the accused | हातचलाखीने दागिने पळविणारी नागपुरकर टोळी गजाआड; आरोपींत तीन महिलांचा समावेश

हातचलाखीने दागिने पळविणारी नागपुरकर टोळी गजाआड; आरोपींत तीन महिलांचा समावेश

Next

अमरावती : धामणगाव रेल्वे शहरातील एका सराफा दुकानातून हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३१ जानेवारी रोजी नागपूर येथून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ८८ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चारही आरोपी नागपुरचे रहिवासी आहेत.

पोलिसांनुसार, नितीन पांडुरंग मेश्राम (४८, रा. कुकडे ले-आउट, नागपूर), शारदा महेश गोयल (५२, रा. वाडी, नागपूर), सीमा दिलीप साखरे (५४, रा. सावित्रीबाई फुलेनगर, नागपूर) व अनिता राजन मोरे (५२, रा. कौशल्यानगर, नागपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी एक पुरुष व तीन महिला धामणगाव शहरातील तिनखेडे ज्वेलर्समध्ये शिरल्या. त्या चौघांनी खरेदीचा बहाणा करीत मालकाची नजर चुकवून ६२ हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती. या गुन्ह्यात नागपूर येथील नितीन मेश्राम याच्यासह सहकारी तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. सदर तिनही महिला ह्या नितीन मेश्राम याच्या नागपूर येथील घरी असल्याची माहितीही स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथून नितीन मेश्रामसह सहकारी तिनही महिलांना अटक केली.

४.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार व चार मोबाइल असा एकूण ४ लाख ८८ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील कारवाईसाठी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींविरुद्ध नागपूर शहर व ग्रामीणमधील जलालखेडा, खापा, वेलतरोडीसह भंडारा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई एसपी अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम, पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, पुरुषोत्तम यादव, उमेश वाकपांजर, मंगेश लकडे, सचिन मसांगे, ऋषाली वाळसे, संदीप नेहारे यांनी केली.

Web Title: Nagpurkar gang arrested for smuggling jewels; Three women are among the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.