कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा! अधिष्ठाताच्या दोन पदांकरिता १७ मे रोजी निवड प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 07:40 PM2019-05-06T19:40:01+5:302019-05-06T19:40:21+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा आहे. १६ मे रोजी कुलसचिवपदासाठी होऊ घातलेल्या मुलाखतीदरम्यान नागपूर येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा आहे. १६ मे रोजी कुलसचिवपदासाठी होऊ घातलेल्या मुलाखतीदरम्यान नागपूर येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यापीठात प्रशासकीय कामात महत्त्वाचा दुवा मानल्या जाणा-या कुलसचिवपदासाठी एकूण १८ अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार उमेदवारांना १६ मे रोजी होणा-या मुलाखतीच्या अनुषंगाने मेल आणि टपालाद्वारे कळविण्यात आले आहे तसेच नव्याने अधिष्ठाताच्या दोन पदांच्या भरतीसाठी १७ मे रोजी मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात ह्यूमॅनिटी अधिष्ठाता पदाकरिता पाच, तर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी अधिष्ठाता पदासाठी आठ अर्ज प्राप्त झाले. या सर्व उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात कळविण्यात आले. मात्र, अधिष्ठाता पदभरतीपेक्षा कुलसचिवपदासाठी स्पर्धा तीव्र असल्याचे चित्र आहे. कुलसचिवपदासाठी १८ अर्ज प्राप्त झाले.
तत्कालीन कुलसचिव अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठात समकक्ष पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे देशमुखांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदाचा राजीनामा दिला. परिणामी अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवपद प्रभारी आहे. मध्यतंरी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही पदभरती पुढे ढकलण्यात आली. मात्र, गत महिन्यात राज्यपाल कार्यालयाने कुलसचिव, अधिष्ठाता पदभरतीसाठी परवानगी दिली. त्यामुळे विद्यापीठाने पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. कुलसचिव या महत्त्वाच्या पदावर आसनस्थ होण्यासाठी नागपूर येथील एका उमेदवाराने प्रचंड लॉबिंग चालविले आहे. ‘परिवारा’तील व्यक्ती असल्याने ‘ते’ नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभारी कुलसचिवांना ‘लॉटरी’?
विद्यापीठ कुलसचिवपदाचा प्रभार डी.एस. राऊत यांच्याकडे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सोपविला. दरम्यान, राऊत यांनीदेखील कुलसचिवपदासाठी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे १६ मे रोजी मुलाखतीदरम्यान डी.एस. राऊत यांना कायमस्वरूपी नियुक्तीची ‘लॉटरी’ लागू शकते, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगत आहे. राऊत हे शिस्तप्रिय आणि नियमानुसार कामकाज हाताळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कुलसचिवपदासाठी हे १८ उमेदवार पात्र
विद्यापीठात कुलसचिवपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. यात अदापुरे, दिनेश चौधरी, चव्हाण, चितलांगे, दालवे, तुषार देशमुख, प्रीती घाटे, हिरेखन, संजय खड्डकार, सुलेकर, एफ.सी. रघुवंशी, रामटेके, प्रशांत गावंडे, प्रफुल्ल उबाळे, जयंत वडते, विलास नांदूरकर, डी.एस. राऊत, संजय खेरडे यांचा समावेश आहे.