नागझिरा अभयारण्यात प्राणांतिक झुंजीत जबर जखमी झालेला वाघ सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:31 PM2019-05-18T18:31:07+5:302019-05-18T18:31:41+5:30
जंगलात वन्यप्राणी विशेषत: वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई ही जीवघेणी असते.
- गणेश वासनिक
अमरावती - टी-८ ने आपल्या हद्दीत वर्चस्व निर्माण करू पाहणा-या टी-९ शी प्राणांतिक झुंज दिली. मात्र, तरुण टी-९ पुढे त्याची ताकद कमी पडली आणि प्रचंड जखमी होऊन जीव वाचवत त्याला रणांगणातून पळावे लागले. त्याला संरक्षण देऊन औषधोपचार करा, अशी मागणी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत उमटली. मात्र, वनाधिका-यांच्या खंबीर भूमिकेमुळे तो कुठल्याही औषधोपचाराशिवाय नैसर्गिक पद्धतीने जखमी अवस्थेतून बरा झाला. ही कहाणी आहे नागझिरा अभयारण्यातील टी-८ या वाघाची.
नागझिरा अभयारण्यात वनविभागाने ‘टी-८’ असे सदर वाघाचे नामकरण केले. तो आपल्या वाघिणीसमवेत जुना नागझिरा जंगलात मुक्त संचार करीत होता. अशातच मार्च महिन्यात पाच वर्षांचा टी-९ हा वाघ आठ वर्षांच्या टी-८ च्या प्रदेशात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दाखल झाला. या दोन वाघांत प्राणांतिक झुंज झाली. यात टी-८ चा नवखा टी-९ च्या ताकदीपुढे निभाव लागला नाही. जबर जखमी झाल्यानंतर त्याने ते क्षेत्र सोडले. त्याच्या नाकावर, चेहº-यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमी वाघ ट्रॅप कॅमे-यात कैद झाला होता.
जंगलात वन्यप्राणी विशेषत: वाघांमध्ये वर्चस्वाची लढाई ही जीवघेणी असते. त्यात एकाचा जीव जातो. त्यादृष्टीने टी-८ सुदैवी ठरला. भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार, वाघाला जखमी ठेवता येत नाही. त्यामुळे एनजीओ, वन्यजीवप्रेमींनी जखमी वाघाला बेशुद्ध करून पकडा, त्याच्यावर औषधोपचार करा, असा धोशा लावला. दरम्यान, काही सामाजिक संस्थांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय गाठले. मनेका गांधी यांच्यासमोर हा विषय गेला. मनेका गांधी यांनी वरिष्ठ वनाधिका-यांशी ‘टी-आठ’ संदर्भात माहिती जाणून घेतली. त्याला काही झाल्यास तुमची खैर नाही, अशी तंबी मनेका गांधी यांनी दिली.
नागझिरातील वनाधिकारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. टी-८ वर उपचार करण्याऐवजी नैसर्गिक पद्धीने बरे होण्यावर त्यांनी भर दिला. मात्र, त्याच्यावर सूक्ष्म नियंत्रण ठेवले. त्याचा संचार, भक्ष्य, दिनचर्या आदींवर बारकाईने लक्ष देण्यात आले. महिनाभरातच नाक, चेहºयावर झालेली जखम बरी झाली. टी-८ पासून दुरावलेली टी-४ ही वाघीण त्याच्याकडे परतली असून, जुना नागझिरा क्षेत्रात दोन बछड्यांसह हा कुटुंबकबिला मुक्त संचार करीत असल्याची नोंद वनाधिका-यांनी घेतली आहे.
मार्चमध्ये झुंज, एप्रिलमध्ये सुखरूप
नागझिरा अभयारण्यात टी-८ आणि पाच वर्षीय टी-९ यांच्यात १० ते १५ मार्च दरम्यान प्राणांतिक झुंज झाली होती. यात टी-८ जखमी झाला. मात्र, जखमी झालेला वाघ सोडून टी-४ ही वाघीण टी-९ सोबत गेली. तब्बल महिनाभरानंतर ती दोन बछड्यांसह एप्रिल महिन्यात टी-८ कडे परतली.
जंगल हे वन्यप्राण्यांसाठीच आहे. वन्यप्राण्यांमध्येसुद्धा मनुष्याप्रमाणे कधी-कधी वर्चस्वाची लढाई होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच पद्धतीने जगू देणे हा कर्तव्याचा भाग आहे. म्हणून तो वाघ महिनाभर जखमी असताना त्यावर लक्ष ठेवले. नैसर्गिकरीत्या त्याची जखम बरी झाली. आता तो सुखरूप आहे.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर