वरुडच्या नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी निलंबित; वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 08:39 PM2022-10-01T20:39:33+5:302022-10-01T20:39:47+5:30
वरुड तालुका वकील संघांद्वारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्र्याची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी नायब तहसीलदारांच्या कारनामांचा पाढाच महसूल मंत्र्यांसमोर वाचला.
गजानन मोहोड
अमरावती : वरुड तहसील कार्यालयात प्रकरणानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांना चांगलेच भोवले आहे. विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांना निलंबित केल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
वरुड तालुका वकील संघांद्वारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्र्याची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी नायब तहसीलदारांच्या कारनामांचा पाढाच महसूल मंत्र्यांसमोर वाचला. याबाबत यापूर्वी तहसीलदार ते विभागीय आयुक्त ते राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यत तक्रारी करण्यात आल्याचेही संघाद्वारा सांगण्यात आले. यावर महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना ‘त्या’ नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याची सुचना केली. त्यानुसार नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
नायब तहसीलदार चौधरी यांच्या विरोधात वकील संघाचे २९ सप्टेंबरचे सभेत सर्वानुमते ठरावदेखील पारीत करण्यात आला होता. त्यानूसार चौधरी यांची बदली करण्यात यावी व त्यांची बदली होईतोवर त्यांच्याकडील प्रकरणे अन्य सक्षम नायब तहसीलदार यांच्याकडे पाठविण्याचे निवेदन देण्याचे ठरले होते. असे वकील संघाद्वारा महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. नायब तहसीलदार चौधरी यांच्या निलंबनाचे मौखिक आदेश विभागीय आयुक्तांनी दिले असल्याचे प्रशासनाने सांगितले.