डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्याने नकुलचा मृत्यू
By admin | Published: August 25, 2015 12:13 AM2015-08-25T00:13:54+5:302015-08-25T00:13:54+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नकुल चंद्रजित सयाम (२५,रा. बनारसी सुकळी) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
नातेवाईकांचा आरोप : इर्विन रुग्णालयात तणाव
अमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नकुल चंद्रजित सयाम (२५,रा. बनारसी सुकळी) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे सोमवारी सायंकाळी नातेवाईकांनी इर्विन रुग्णालयातील डॉक्टरांवर रोष व्यक्त केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला. आ.बच्चू कडू व पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला.
बनारसी सुकळी येथील रहिवासी नकुल सयाम हा रविवारी सकाळी शेतात तणनाशकाची फवारणी करण्याकरिता गेला. फवारणी करिताना नकुलच्या तोंडात विषारी औषधी गेल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्याला कुटुंबीयांनी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नकुलचा उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी १ वाजतादरम्यान त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे तेथील परिचारिकांना नातेवाईकांनी नकुलची प्रकृती पहावयास सांगितले. त्यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे परिचारिकांनी डॉक्टरांना कॉल केला. मात्र, वेळेवर डॉक्टर रुग्णालयात आले नाही. असा आरोप नातेवाईकांचा आहे
एसडीओंच्या नेतृत्वात चौकशी समिती
आमदार बच्चू कडू यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याशी चर्चा करून या घटनेची चौकशीची मागणी केली. त्यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.