नाले सफाई, नाल्यांची केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:49+5:302021-07-25T04:11:49+5:30
अमरावती : पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला असताना बहुतेक प्रभागांमधील नाल्या, कच्च्या नाल्यांची सफाई झालेली नाही. प्रशासनाचा ...
अमरावती : पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला असताना बहुतेक प्रभागांमधील नाल्या, कच्च्या नाल्यांची सफाई झालेली नाही. प्रशासनाचा जोर फक्त नाले सफाईवर असल्याने व आता मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने कीटकजन्य रोगांच्या आजारात वाढ झालेली आहे. स्वच्छतेवर पदाधिकाऱ्यांचे मौन असल्याने प्रशासन ढिम्म आहे. स्वच्छता कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
महापालिका क्षेत्रात १६ मोठे नाले व १८ हून अधिक उपनाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नालेसफाईला वेग यावा, यासाठी कंत्राटे दिली जातात. मात्र, शहरात असलेल्या लहान नाल्या व कच्च्या नाल्यांच्या सफाईचा विसर कंत्राटदारांना पडतो. त्यामुळे पाणी तुंबून गटार रस्त्यावर येत असल्याची स्थिती आऊटस्कड भागात आहे. या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक लिक्विड टाकले जात नाही तसेच बहुतेक भागात धूरळणी व फवारणी फक्त फोटोसेशनपुरतीच केल्या जात असल्याची स्थिती आहे.
प्रत्येक प्रभागातील नाल्यांची सफाई, कंटेनरची स्वच्छता, त्यालगतचा कचरा उचलणे महत्त्वाचे आहे. शहरात रिकाम्या प्लॉटमध्ये झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात वाढतात. प्लॉटमालकांना नोटीस देऊन रिकामे प्लॉट साफ करण्यास सांगितले जात नसल्याने शहरात दिवसेंदिवस अस्वच्छता व कचऱ्यांचे ढीग वाढत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
आयुक्तांचे आदेश, अंमलबजावणी केव्हा?
महापालिकेच्या मंगळवारच्या आमसभेत आयुक्तांनी हा विषय गंभीरतेने घेत प्रत्येक प्रभागातील सफाई कंत्राटदार, आरोग्य अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, बीट प्यून यांच्या नावासह मोबाईल नंबरची यादी त्वरित जाहीर करण्याचे आदेश दिले. काही समस्या असल्यास नागरिकांना तक्रार करणे सोयीचे होणार आहे. मात्र, यावर अंमलबजावणी केव्हा, हा खरा प्रश्न आहे.
बॉक्स
स्वच्छतेवर महिन्याकाठी २.५० कोटींचा खर्च
महानगरपालिकेकडून सर्वांत जास्त खर्च आरोग्य व स्वच्छता विभागावर होत आहे. तसे पाहता, प्रत्येक प्रभागात दरमहा ९ ते १० लाखांचा खर्च करण्यात येतो. म्हणजेच अडीच कोटींवर खर्च स्वच्छतेवर होत असताना परिणाम कितीसा साध्य होतो, हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक प्रभागातील या समस्येवर आतापर्यंत एकही पदाधिकारी किंवा नगरसेवकांची चुप्पी का, हा नागरिकांचा सवाल आहे.
कोट
प्रत्येक प्रभागातील नियमित स्वच्छता व्हावी, यासाठी नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने स्वच्छता कंत्राटदार व संबधितांचे संपर्क क्रमांक तात्काळ जाहीर करण्याचे व कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका
कोट
पावसाळ्यापूर्वी नियोजन न करता सत्तापक्षाने शहर वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. किमान प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत प्रत्येक प्रभागात धूरळणी, फवारणी करावी.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता