राजापेठ बसस्थानकाला छत्रपती शिवाजींचे नाव
By admin | Published: March 27, 2016 12:02 AM2016-03-27T00:02:25+5:302016-03-27T00:02:25+5:30
कित्येक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजापेठ येथील नवनिर्मित बसस्थानकाला शनिवारी नांव मिळाले.
विद्यार्थी स्वाभिमानकडून नामकरण : आ. रवि राणांचा पुढाकार
अमरावती : कित्येक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजापेठ येथील नवनिर्मित बसस्थानकाला शनिवारी नांव मिळाले. आ. रवि राणाप्रणित विद्यार्थी स्वाभिमानी संघटनेने राजापेठ बसस्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी बसस्थानक राजापेठ, असे केले आहे. या भागात तशा कमानी आणि प्रवेशव्दार लावण्यात आले.
बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या उपस्थिस्तीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा नामकरण सोहळा पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी स्वाभिमान संघटनेने राजापेठ बसस्थानकाला रयतेच्या राजाचे नाव दिले. स्थानिक गद्रे चौकात बंजरंग टेकडीच्या बाजूच्या परिसरात मध्यवर्ती बसस्थानक साकारण्यात आले आहे. बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतरही या बसस्थानकाला कुठलेही नांव देण्यात आले नाही. किंवा उद्घाटन होऊन येथून एसटीची ये-जा होऊ शकली नाही. राजापेठ - गद्रे चौकातील या बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव द्यावे, अशी मागणी विद्यार्थी, युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत केली होती. युवा स्वाभिमानचे जितू दुधाने आणि अनूप अग्रवाल यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शनिवारी शिवजयंती पर्वावर स्वाभिमान परिवाराने पुढाकार घेत आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत राजापेठ बसस्थानकाचे छत्रपती शिवाजी बसस्थानक, असे नामकरण केले. यावेळी राणा यांच्या समवेत जितू दुधाने, बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, विकास इंगोले, विनोद गुहे, संजय हिगांसपुरे, ज्योती सैरिसे, सुमती ढोक यांची उपस्थिती होती. रयतेच्या राजाचे नांव देण्यासाठी परवानगी हवी कशाला, असा प्रश्न करीत राणांनी या नामकरण सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)