मृत बहिणीच्या नावाने हडपली रोहयोची मजुरी अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:52 PM2018-08-26T22:52:26+5:302018-08-26T22:53:27+5:30
मेळघाटात मग्रारोहयोची कामे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. तालुक्यातील आकी येथे असलेल्या रोजगार सेवकाने मृत बहिणीसह स्वत:ही हजेरीपत्रकावर मजूर दाखवून हजारो रुपये उकळल्याची तक्रार विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प. सीईओंना करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटात मग्रारोहयोची कामे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. तालुक्यातील आकी येथे असलेल्या रोजगार सेवकाने मृत बहिणीसह स्वत:ही हजेरीपत्रकावर मजूर दाखवून हजारो रुपये उकळल्याची तक्रार विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प. सीईओंना करण्यात आली आहे.
राजेश बाबू जावरकर असे की येथील या बहाद्दर रोजगार सेवकाचे नाव असून त्याने त्याची बहीण कविता बाबू जावरकर ही २४ जानेवारी २००९ रोजी मयत झाली असताना तिला २०१० ते २०१३ पर्यंत दगडीबांध,गावतलाव नूतनीकरणच्या कामावर हजर दाखवून आॅनलाईन हजारो रुपयांचे मस्टर काढण्यात आल्याची तक्रार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंसह आदींना आकी ग्रामपंचायतीचे सदस्य किसन मोती कासदेकर, मंगल चाटी जावरकर यांनी केली आहे. सोबत पुरावेसुद्धा जोडण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाचे हजारो रुपये हडपणाºया रोजगार सेवकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये रोजगर सेवकांकडून होणाºया विविध कामात बोगस मजुरांची नोंदणी करून त्यावर लाखो रुपये हडपले जात असल्याचे मेळघाटात आतापर्यंत वारंवार उघडकीस आले आहे. तरीसुद्धा प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून बसल्याचे चित्र आहे. परिणामी अधिकारी आणि रोजगार सेवकाचे तर साटेलोटे नाही ना, असे आता आदिवासी बोलू लागले आहे. त्यातूनच या भ्रष्ट रोजगार सेवकाचे मनोबल वाढले आहे.
स्वत:सह आईचीही मजुरी काढली
भ्रष्टाचार करावा तर किती याचे भान भ्रष्टाचाऱ्याला नसतेच त्याचा प्रत्येय राजेश बाबू जावरकर या रोजगार सेवकाने करून दिला. मृत बहिणीच्या नावावर मजुरी हडपल्यावरही कुणी काहीच केले नसल्याचे पाहून त्याने त्याची आई बेबी बाबू जावरकर यांना सुद्धा रोजगार हमी योजनेचे मजूर बनवून टाकले. प्रत्यक्षात बेबी जावरकर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत पोषण आहाराची खिचडी बनवतात तरीसुद्धा राजेशने आईला मजूर दाखविले आणि त्यावरसुद्धा हजारो रुपये हडपल्याचे दिसून आले आहे.
बीडीओंनी दाखविली तक्रारीला केराची टोपली
आकी येथील रोजगार सेवकांचा हा कारनामा ४ जून रोजी चिखलदरा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांना लेखी तक्रारीद्वारे कळविण्यात आला. तरीसुद्धा निगरगट्ट या अधिकाऱ्याने कुठल्याच प्रकारची कारवाई केली नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी वरिष्ठांना देखील पहिल्या तक्रारीवर कुठलीच दखल घेतली गेली नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे रोजगार सेवकासोबतच पंचायत समिती स्तरापर्यंतची यंत्रणा याप्रकरणात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
आकी येथील रोजगार सेवकाने मृत व घरातील सदस्यांच्या बोगस मजुरीची तक्रार दिली. मात्र, पंचायत समितीने कुठलीच कारवाई केलेली नाही.
-किसन कासदेकर,
तक्रारकर्ता
ग्रा.पं. सदस्य, आकी