अपात्र सदस्यांचे नाव फलकावर
By admin | Published: April 5, 2015 12:29 AM2015-04-05T00:29:54+5:302015-04-05T00:29:54+5:30
तालुक्यातील शिंदी (बु.) ग्रामपंचायतीच्या सदस्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करीत विकासकामांचा कंत्राट स्वत:च्या मुलाला दिल्यामुळे ...
पदाचा दुरुपयोग : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामपंचायतीची केराची टोपली
अचलपूर : तालुक्यातील शिंदी (बु.) ग्रामपंचायतीच्या सदस्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करीत विकासकामांचा कंत्राट स्वत:च्या मुलाला दिल्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सदस्याचे सदस्यत्व अपात्र घोषित केले आहे. शिंदी ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा कंत्राट स्वत:च्या मुलाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लाभ मिळवून दिल्याप्रकरणी अमरावती अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने शेख इस्माईल शेख बहाद्दर यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र केले. या घटनेला दहा दिवस झालीत तरीही कार्यकारिणी फलकावर अपात्र सदस्याचे नाव कायमच असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.
शिंदी (बु.) येथे ग्रामपंचायत सदस्य शेख इस्माईल हे सन २०१० मध्ये निवडून आले होते. त्यांनी ग्रा. पं. अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांत मुलगा शेख तनवीर शेख इस्माईल यास सदर विकासकामे मिळवून देण्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेऊन मुलाला कंत्राट मिळतील याची तजविज केली. त्यामध्ये जनसुविधा स्मशान रोड, दलितवस्ती सुधार योजना, १३ वित्त आयोगाची विकास कामे तसेच जि. प. व पं. स. स्तरावरील विकासकामे मुलाला मिळवून दिली.
यावर सदस्य शेख इस्माईल शेख बहाद्दर यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वैयक्तिक लाभ घेतल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांच्या न्यायालयात सय्यद कलिमुल्ला व राहुल गाठे यांनी सदस्य शेख ईस्माईल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या याचिकेवर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली असता आरोप सिद्ध झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाअन्वये याचिकाकर्ते यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर करून शेख इस्माईल शेख बहाद्दर ग्रामपंचायत सदस्य शिंदी (बु.) यांची उक्त कलमान्वये अनहर्ता सिद्ध होत असल्याने त्यांना सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. हा आदेश ११ मार्च २०१५ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी पारित करून आज दहा दिवस झालीत. त्या आदेश पत्राची प्रत ग्रा. पं. कार्यालयास मिळाली तरीही ग्रामपंचायत कार्यालयातील कार्यकारिणी फलकावर अपात्र सदस्यांचे नाव कायम असल्याने येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. विशेष म्हणजे या आदेशावर ग्रामपंचायत शिंदी (बु.)चे सचिव यांनी रिक्त पद असल्याचे पत्र पुढील कार्यवाहीकरिता काढल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे. एकीकडे पद रिक्त असल्याचे ग्रामविकास अधिकारी कबूल करतात तर दुसरीकडे फलकावरील अपात्र सदस्यांचे नाव कायम ठेवत असल्याने याविषयी कुठेतरी शंका निर्माण होत असल्याची चर्चा गावात आहे.(तालुका प्रतिनिधी)