रक्तदाता संघाने उंचावले वरूडनगरीचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 09:58 PM2018-01-30T21:58:04+5:302018-01-30T21:58:30+5:30
१ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत अवघ्या दोन वर्षांच्या काळात एक कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे रक्त संकलित करून त्याचा गरजूंना मोफत पुरवठा करणारा ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाने वरूडनगरीचे नाव उंचावले आहे. राज्यात मोफत रक्तपुरवठा करणारा हा एकमेव रक्तदाता संघ होय.
संजय खासबागे।
आॅनलाईन लोकमत
वरूड : १ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत अवघ्या दोन वर्षांच्या काळात एक कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे रक्त संकलित करून त्याचा गरजूंना मोफत पुरवठा करणारा ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाने वरूडनगरीचे नाव उंचावले आहे. राज्यात मोफत रक्तपुरवठा करणारा हा एकमेव रक्तदाता संघ होय.
वरूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत रक्त चणचणीबाबत चर्चा केली आणि २०१५ मध्ये ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाची स्थापना झाली. या संघाने तीन वर्षांमध्ये १६ हजारांवर रक्तपिशव्यांचे संकलन केले. रक्तदाता संघाने रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी, नागपूरची डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जीवनज्योती रक्तपेढी आणि वरूड ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला. दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार व शासनाच्या अटी-नियमांना अधीन राहून मोफत रक्तपुरवठा केला जातो. रक्तदान चळवळ अविरत सुरू ठेवण्याकरिता रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटिये, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, दिलीप भोंडे, सचिव चरण सोनारे, शैलेश धोटे, कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार, संघटक सुधाकर राऊत, सदस्य संजय खासबागे, पंकज केचे, योगेश ठाकरे, आशिष वानखडे, मनोहर थेटे, यशपाल जैन, सचिन परिहार, अतुल काळे, प्रवीण खासबागे, राहुल बरडे, सुनील उईके परिश्रम घेत आहेत. रक्तदाता संघाच्या कार्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, सेवाभावी संस्थांनी घेत वेळावेळी सत्कार केला.
मोफत रक्तपुरवठा
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये शासकीय रक्तपेढीमार्फत रक्त पुरविण्यात येऊन रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. नागपूरच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाºया गरजू रुग्णांकरिता मोफत रक्तपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून डॉ. हेडगेवार रक्तपेढी, जीवनज्योती रक्तपेढी यांच्यासोबत लेखी क रार करून मोफत रक्ताची सुविधा केली आहे. मोफत रक्तपुरवठा करणारा रक्तदाता संघ हे राज्यातच नव्हे, तर देशात एकमेव ठरले आहे, हे विशेष.
रक्तदान चळवळीचा ध्यास..: मोर्शी येथील जयदेवा मंडळाच्यावतीने वरुड येथे रक्तदान चळवळीला उभारी देण्याचा प्रयत्न झाला. याची प्रेरणा घेऊन १० वर्षांपूर्वी प्रवीण चौधरी यांनी महारक्तदान शिबिर घेतले. या चळवळीला व्यापक स्वरूप प्रमोद पोतदार यांच्या संकल्पनेतील रक्तदाता संघाने आणले. महिन्याला किमान ४०० रक्त पिशव्यांचे लक्ष्य संघाचे असते. वेळीच रक्त उपलब्ध होत असल्याने सिकलसेल, अॅनेमिया आणि थॅलसेमियाच्या ६६ रुग्णांना रक्तदाता संघाने दत्तक घेतले आहे.