यशोमतींच्या नावावर भाजप जिल्हाध्यक्षांनी फासले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:35 PM2018-03-07T23:35:50+5:302018-03-07T23:35:50+5:30
आ. यशोमती ठाकुरांनी ४ मार्चला तालुक्यातील सार्शी येथे उद्घाटन केलेल्या जलयुक्तच्या फलकावर भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी मंगळवारी काळा रंग लावण्याचा प्रकार केला.
सूरज दाहाट ।
आॅनलाईन लोकमत
तिवसा : आ. यशोमती ठाकुरांनी ४ मार्चला तालुक्यातील सार्शी येथे उद्घाटन केलेल्या जलयुक्तच्या फलकावर भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी मंगळवारी काळा रंग लावण्याचा प्रकार केला. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांनी सूर्यवंशी यांच्याविरोधात माहुली ठाण्यात तक्रार दाखल केली. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला आमदारांचा अवमान करणाºया सूर्यवंशींना तिवसा तालुक्यात प्रवेशबंदी करून त्यांनाही काळे फासू, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
तालुक्यात यशोमती ठाकुरांच्या विकासकामांचा झंझावात सुरू असल्याने धास्तावलेल्या भाजपद्वारा श्रेय लाटण्याचा प्रकार वारंवार केला जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. या प्रकारामुळे गावात तणावपूर्ण शांतता व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, माहुली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पाटबंधारे विभागामार्फत सार्शी येथे ७६ लाख २४ हजार ३०५ रुपये निधीच्या गावतळ्याच्या कामाच्या नामफलकाचे भूमिपूजन आ. यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, पंचायत समिती उपसभापती लोकेश केने यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी सकाळी भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी सार्शी येथे जाऊन सदर काम भाजप पदाधिकाºयांनी खेचूून आणले आहे. यात आमदारांचा काही सबंध नसल्याने भूमिपूजन पालकमंत्री करतील, असे सांगितले. उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांसह गावकºयांशी सूर्यवंशी यांनी हुज्जत घातली व त्यांनी आ. ठाकुरांनी भूमिपूजन केलेल्या कामाचे फलकाला काळे लावण्याचा प्रकार केला. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकाºयांनी माहुली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सूर्यवंशी यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
- तर सर्वच फलक बदलवू - दिनेश सूर्यवंशी
मुख्यमंत्री व पालकमंत्री यांची नावे हेतुपुरस्सर वगळणे व तिवसा पं.स. सभापतींचे नाव वगळून फक्त काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची नावे फलकावर टाकणे यामुळे ही विकासकामे केवळ विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्यामुळे होत असल्याचा चुकीचा संदेश जात आहे. ही कामे भाजप सरकारची नसून, व्यक्तिगतरीत्या आ. ठाकूर यांच्या निधीतून वा संपत्तीमधून होत असल्याचे पद्धतशीरपणे पसरवले जात आहे. १० लाखांच्या वर कोणत्याही विकासकामाचे भूमिपूजन, उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले पाहिजे, असा यापूर्वीच्या शासनाचाच निर्णय आहे. जलयुक्त शिवाराची ७० लाख व त्यावरची पाच कामे तिवसा तालुक्यात सुरू झाली. ज्या फलकावर आवश्यक नावे नसतील, असे सर्व फलक बदलवून नव्याने लावण्याचा कार्यक्रमच यापुढे हाती घेणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्षांनी थिल्लरपणाचा कळस केला आहे. या विभागाची आमदार असल्याने भूमिपूजनाचा माझा अधिकार आहे. विकासकामाचे राजकारण करू नये. त्यांना उत्तर देण्यास मी सक्षम आहे.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा
भाजप जिल्हाध्यक्षांचा खोडसाळपणा आता सहन करणार नाही. त्यांना तालुक्यात प्रवेशबंदी करू. त्यांच्या वाहनाला व त्यांनाच काळे फासल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याविरोधात आंदोलन करू.
- वैभव वानखडे
उपाध्यक्ष, नगरपंचायत
सूर्यवंशींच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार
तिवसा : आ. यशोमती ठाकूर यांनी उद्घाटित फलकाला काळे फासणारे भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला बुधवारी येथे महिला काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी बांगड्यांचा हार घालून निषेध व्यक्त केला.
पेट्रोल पंप चौकात नगराध्यक्ष राजकन्या खाकसे व शहराध्यक्ष रूपाली काळे यांच्या नेतृत्वात शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी एकवटल्या. भाजप शासनाच्या महिलाविरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आल्या. उपस्थित सर्व महिला पदाधिकाºयांनी लगेच तिवसा पोलीस ठाणे गाठून ठाणेदारांशी चर्चा केली. आ. ठाकूर यांचा अवमान केल्याबाबत सूर्यवंशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका सारिका दापूरकर, चैताली इंगळे, संध्या पखाले, शीतल जाजू, दुर्गा मस्के, चित्रा पवार यांच्यासह अभिजित बोके, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, वैभव वानखडे आदी उपस्थित होते.