‘भूदान’चा शर्तभंग करणाऱ्याचेच नावे फेरफार नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:52+5:302021-06-22T04:09:52+5:30
अमरावती : भूदान यज्ञ मंडळाने भूमिहीन व्यक्तीला दिलेला एक हेक्टरचा पट्टा त्यांनी विकला व त्याची भोगवटदार वर्ग -१ अशी ...
अमरावती : भूदान यज्ञ मंडळाने भूमिहीन व्यक्तीला दिलेला एक हेक्टरचा पट्टा त्यांनी विकला व त्याची भोगवटदार वर्ग -१ अशी नियमबाह्य नोंद तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी केली. याविषयीची बाब निदर्शनात आल्याने तहसीलदारांनी फेरफार रद्द करण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रस्तावित केले. त्यांनी संबंधित फेरफार रद्द केला. मात्र, तो ज्या भूधारकाने शर्तभंग करून जमीन विकली, त्याच्या नावे फेरफार कायम करण्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी एसडीओच्या आदेशाचे पुनर्विलोकन करून ही जमीन भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम २५ अन्वये पुनर्वाटपाच्या सोयीकरिता मंडळाचे नावे करण्याची मागणी भुदान यज्ञ मंडळाच्या अंकेक्षण विभागाचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस यांनी सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.
अमरावती जिल्ह्यात वरूड तालुक्यातील ममदापूर येथील एक हेक्टर जमिनीचा पट्टा २४ नोव्हेंबर १९९६ मध्ये भूमिहीन बाबाराव शामराव घोरमाडे यांना दिला होता. त्यानुसार या जमिनीचा सत्ता प्रकार २ मध्ये नोंद करणे गरजेचे असताना तलाठ्याद्वारा पुनर्लेखनात याची नोंद भूदानचे नावे न करता भोगवटदार वर्ग -१ असा केला. त्यामुळे घोरमाडे यांनी ही जमीन संध्या प्रभाकर इंगोले यांना व २४ मे २०१४ रोजी विक्री केली. इंगोले यांनी सतीश महल्ले व अरुण महल्ले यांना विक्री केली होती. उपविभागीय मोर्शी यांच्या आदेशाने हे फेरफार रद्द करण्यात आले असले तरी भूदान नियमाचे शर्तभंग करणाऱ्या शामराव घोरमाडे यांच्या नावे ही जमीन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
बॉक्स
‘लोकमत’ वृत्तानंतर वरूड तहसीलदारांची कारवाई
वरूड तालुक्यात तलाठ्यांद्वारा नियमबाह्य फेरफार घेण्यात आल्याचे वृत्त लोकमतच्या १४ जानेवारी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार तहसीलदारांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. यात हा प्रकार सिद्ध झाल्यानंतर वरूड तहसीलदार यांनी फेरफार रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना प्रस्तावित केले होते. त्यानुसार हे फेरफार रद्द करण्यात आले असले तरी भुदान यज्ञ मंडळाच्या नावे न करता ज्याने शर्तभंग केला त्याच व्यक्तीच्या नावे नोंद घेण्यात आलेली आहे.