सांडपाण्यावर साकारला नाना-नानी पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:37 AM2018-04-20T01:37:44+5:302018-04-20T01:37:44+5:30
राज्यात यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमापूर्वीच अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा येथील पर्यावरणप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी गावातील सांडपाण्याचा विनियोग करीत नाना-नानी पार्क आणि रस्त्याने वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : राज्यात यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमापूर्वीच अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा येथील पर्यावरणप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी गावातील सांडपाण्याचा विनियोग करीत नाना-नानी पार्क आणि रस्त्याने वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
दिवसेंदिवस पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. दुसरीकडे वृक्षतोड होत आहे. यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळेच परतवाडानजीक सावळी दातुरा येथील आदिवासी पर्यावरण संघटनेने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. प्यारेलाल प्रजापती यांनी चक्क सांडपाण्याचा वापर करून सावळी ते धामनगाव गढी या तीन किमी रस्त्यावर वृक्षारोपण वे संगोपन करून झाडे वाढविली. यासाठी गावातील सांडपाणी एका ठिकाणी अडवून, ते मोटारीने झाडांपर्यंत नेले. या झाडांमध्ये पिंपळ, उंबर, कडुनिंब, करंज, आवळा, सीताफळ, जांभूळ कन्हेर, जास्वंद, तगर आदी वृक्ष, फळझाडे, फुलेझाडे आहेत. हजारो झाडे जगत असताना शासनाकडून त्यांनी छदामही मिळविला नाही. आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खानझोडे, प्यारेलाल प्रजापती, नरेंद्र भाकरे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, ममता डहाके, अक्षय उमप, पवन जरिये, संजय उगले, प्रदीप चांंदूरकर यांनी सदर रस्ता व जुळ्या शहरातील नागरिकांच्या सहकार्याने केलेला संकल्प कौतुकास्पद ठरला आहे.
पार्क तयार करून दिला पर्यावरण संदेश
आजूबाजूची वृद्ध मंडळी व चिमुकल्या बालकांसाठी सकाळ-सायंकाळी विरंगुळ्यासाठी आवश्यक असे उद्यान नसल्याचे पाहता, सावळी दातुरा येथील शासकीय जागेवर नाना-नानी पार्कची संकल्पना पुढे आली. आदिवासी पर्यावरण संघटनेने विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली. त्यांचे दोन वर्षांचे श्रम वाया गेले नसून, ग्रामस्थांसाठी सुंदर उद्यान येथे साकार झाले आहे.
सांडपाण्याचा योग्य विनियोग करून २ वर्षांपासून वृक्षलागवड व संगोपन केले जात आहे. आज टुमदार उद्यान आणि रस्त्याच्या कडेला झाडं मोठी होत आहेत. पर्यावरणासाठी संघटनेसोबत घेतलेला वसा कुणीही टाकणार नाही.
- प्यारेलाल प्रजापती, आदिवासी पर्यावरण संघटना, परतवाडा