#MeToo: नाना असभ्य आहे, पण 'तसलं' काही करणार नाही- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 11:41 AM2018-10-18T11:41:53+5:302018-10-18T11:45:52+5:30
राज ठाकरेंकडून नाना पाटेकर यांची पाठराखण
अमरावती: अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे सध्या अभिनेते नाना पाटेकर वादात सापडले आहेत. तनुश्री दत्तानंनाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. मात्र नाना पाटेकर महिलेशी गैरवर्तन करेल असं वाटत नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नाना पाटेकर कितीही खराब असला, तरीही महिलेसोबत गैरवर्तन करणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी नानांची पाठराखण केली. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं.
नाना पाटेकर विचित्र गोष्टी करतो, याची मला कल्पना आहे. तो असभ्य माणूस आहे. मात्र असं असलं तरी तो महिलेशी गैरवर्तन करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात न्यायालय निकाल देईल. त्यामुळे आपण फक्त आरोपांवरुन कोणाला दोषी धरु नये, असं आवाहन राज यांनी केलं. 'मी नाना पाटेकर यांना ओळखतो. तो असभ्य आहे. तो विचित्र गोष्टी करतो. मात्र तो असं काही करेल, असं मला वाटत नाही. यामध्ये न्यायालय योग्य निकाल देईल. आपण त्यावर निकाल देऊन कोणाला दोषी धरु नये,' असं राज ठाकरे म्हणाले.
तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका यांनी त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली. याशिवाय महिला पत्रकारांनीदेखील त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांवर भाष्य केलं. त्यामुळे सोशल मीडियात #MeToo अभियान सुरू झालं. यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. 'मी टू हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यावर ट्विटरवर होणारा वाद मात्र योग्य नाही,' असं राज यांनी म्हटलं. देशात सध्या अनेक महत्त्वाचे विषय आहेत. इंधनाचे वाढते दर, रुपयाचं घसरतं मूल्य, बेरोजगारी हे चिंताजनक मुद्दे आहेत. त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मी टू अभियान सुरू करण्यात आलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला.