‘मित्रा’ योजनेंतर्गत नांदगावला टेक्सटाइल पार्क! देवेंद्र फडणवीस, जिल्हा कृषी महोत्सवाच्या समारोपात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 07:22 PM2023-03-05T19:22:59+5:302023-03-05T19:23:48+5:30
कापूस, कापड ते फॅशन हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाइल झोनची निर्मिती करण्यात आली.
गजानन मोहोड
अमरावती :
कापूस, कापड ते फॅशन हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाइल झोनची निर्मिती करण्यात आली. आता केंद्र शासनाच्या ‘मित्रा’ योजनेंतर्गत नांदगावला टेक्सटाइल पार्क होण्यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे ‘माविम’ व ‘कारितास इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवारमुळे राज्यात ३६ लाख हेक्टर शेती रब्बी पिकाखाली आली. आता नव्याने जलयुक्त-२ सुरू करीत आहोत. याशिवाय ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती’ अभियानदेखील सुरू करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रास्ताविक किसनराव मुळे, सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर व आभार अनिल खर्चान यांनी मानले.
जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉल
जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉल तयार करण्यात येईल. याद्वारे बचत गटांना बाजारपेठ व नागरिकांना दर्जेदार पदार्थ उपलब्ध होतील. येथे फिरत्या पद्धतीने जागा मिळेल. याशिवाय वऱ्हाडी खाद्यसंस्कृती मुंबईतदेखील रुजावी यासाठी मुंबई, पुण्यात महोत्सव आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. फडणवीस म्हणाले.