वातावरणीय बदलास राज्यात नंदूरबार सर्वाधिक संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:09 AM2019-05-03T11:09:39+5:302019-05-03T11:15:00+5:30
वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे. यामध्ये सन १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी हवामान व तापमानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सन २०३० ते २०७० या कालखंडातील वातावरणीय बदलांचे शास्त्रोक्त अनुमान काढले आहे. यामध्ये वातावरणीय बदलास सर्वाधिक अतिसंवेदनशील निर्देशांकांत (व्हर्नेबिलिटी इंडेक्स) नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे. असुरक्षिततेमध्ये जळगाव, संवेदनशीलमध्ये औरंगाबाद, तर अनुकूलनमध्ये सिंधुदूर्ग जिल्हा प्रथमस्थानी आहे.
जागतिक स्तरावरील वातावरणीय बदलाचे अनुमान महाराष्ट्र राज्यात जसेच्या तसे लागू होत नसल्याने राज्याची भौगोलिक स्थिती व स्थान लक्षात घेता शास्त्रोक्त अनुमान काढण्यात आले. यासाठी यु.के.मेट, टेरी यासंस्थांद्वारा रिजन क्लॉयमेट मॉडेलिंग सिस्टम व एचएडीआरएम३पी या दोन मॉडेलची निवड करून अनुमान काढण्याचे काम केले आहे. या अनुमानाची पडताळणी करण्यासाठी करण्यासाठी सन १०७० ते २००० या कालावधीतील राज्य शासनाच्या विविध विभागाकडची सांखिकी माहिती उपलब्ध करून देण्यात येऊन प्रक्षेपित अंदाजांची पडताळणी करण्यात आली व या अहवालानुसार राज्यातील विभागनिहाय तापमान व पर्जन्यमानातील होणाºया संभाव्य बदलाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्यात कमालपेक्षा किमान तापमानाचे सरासरी तापमान वाढणार आहे व यामुळेच पर्जन्यमान व उष्णता निर्देशांकात बदल होणार असल्याचे अनुमान नोंदविण्यात आलले आहे. या बदलास सामोरे जाताना महत्त्वाच्या १४ शिफारसी राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरणात करण्यात आलेल्या आहेत.
फळपिकांवर कीड व रोग वाढणार
सन २०३०, २०५० व २०७० या कालखंडात वाढते तापमान व आर्द्रतेमधील बदलामुळे डाळींब, द्राक्षे, केळी, आंबा व संत्रा या पिकांवर रोगराई वाढणार आहे. पिकांची तग धरण्याची क्षमता कमी होणार आहे. अनियमित पाऊस यासाठी पोषक राहणार असल्यामुळे सरासरी उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होणार आहे. रोगराईस पोषक वातावरणामुळे मलेरिया, डेंग्यू आजाराची क्षेत्रव्याप्ती वाढणार आहे. संभावित अतिवृष्टीमुळे लोकवस्तीवर विपरित परिणाम होईल. वाढणाºया उष्णतामानामुळे उर्जेची मागणी वाढणार आहे.
वातावरणीय बदलास अतिसंवेदनशील प्रथम दहा जिल्हे
अतिसंवेदनशील निर्देशांक- नंदूरबार, धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम गडचिरोली.
संवेदनशील : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, नांदेड, अकोला, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ
असुरक्षित : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अकोला, नंदूरबार, नाशिक, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ
अनुकूलन : सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, वर्धा, रायगड, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, भंडारा