घनकचरा विलगीकरणात महापालिका ‘नापास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:56 PM2018-05-06T22:56:29+5:302018-05-06T22:56:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कचऱ्यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकचऱ्याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कचऱ्याचे विलगीकरण करणे अनिवार्य राहील. राज्यात विविध ठिकाणी पेटलेल्या कचरा प्रश्नाच्या अनुषंगाने या निर्देशांना अत्याधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका, असे विलगीकरण करण्याची ‘कचरा लाख मोलाचा’ ही मोहीम १ मे २०१७ पासून राबविण्यात आली. मात्र, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ती मोहीम यशस्वीपणे राबविली नसल्याचे निरिक्षण सरकारने नोंदविले आहे. शासनस्तरावरून वारंवार पाठपुरावा करूनदेखील अद्यापही कचऱ्याचे समाधानकारकरीत्या विलगीकरण होताना दिसत नसल्याचे निरीक्षण नगरविकास विभागाने नोंदविले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदीनुसार, राज्यातील प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूकही विलगीकृतच...: शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १०० टक्के घनकचºयाचे घरोघरी (डोअर टू डोअर) जावून विलगीकृत स्वरूपात संकलन करण्याची कारवाई करण्यात यावी, याशिवाय त्या घनकचºयाची विलगीकृत स्वरूपात वाहतूक करणे अनिवार्य असेल. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत अनेक महापालिकांमध्ये ओला व सुका कचरा एकत्रितपणे कम्पोस्टवर नेऊन टाकला जातो. ती पद्धत बंद करून त्यात सुधारणा करावी लागणार आहे.
असे आहेत निर्देश
शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १०० टक्के घनकचऱ्याचे, निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा असे विलगीकरण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नगर परिषद व जुन्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये मे २०१८ अखेरपर्यंत तसेच सर्व महापालिका यामध्ये जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कचऱ्याचे विलगीकरण करणे अनिवार्य असेल.