पीएम’नी साधला प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 07:08 PM2018-06-05T19:08:45+5:302018-06-05T19:08:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अमरावती महापालिका क्षेत्रातील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.
अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अमरावती महापालिका क्षेत्रातील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. अमरावतीच्या लाभार्थ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स येथील जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आली होती.
केंद्रशासनाच्या गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री आणि महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेंतर्गत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या घटक क्र. ४ मधील एकूण १५ पात्र महिला लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पंतप्रधानांनी या लाभार्थ्यांशी संवाद साधत योजनेतील अडथळ्यांविषयीचीही माहिती घेतली. तथा हक्काचे घरकुलाबाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक क्र. ४ मधील घरकुलाचे जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झालेल्या व अनुदानाचा पहिला टप्पा प्राप्त असलेल्या अशा एकूण १५ पात्र लाभार्थी महिला निवडण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये मायावती विलास मेश्राम, नंदा प्रकाश मुंगलकर, अनिता निरंजन बघेल, मेघा दिलीप थोरात, मीरा काशीनाथ यादव, लिलाबाई रामदास विघे, कल्पना दिलीप तेलमोरे, सुशीला दिपकराव जगताप, आशा नागेश जंगजोड, अर्चना दिनेश निकम, छाया अरविंद कढाणे, अनिता श्यामसिंग चव्हाण, कुंदा राजेश राऊत, बेबीनंदा संजय वाघमारे, पुष्पा दिनेशराव डोंगरे सहभागी झाल्या होत्या. यावेळी या १५ पात्र महिलांना जिल्हाधिकारी, यांच्याद्वारे या व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान उपस्थिती प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष शिंदे, डी.आर.डी.ए.चे प्रकल्प संचालक अहमद, प्रभारी शहर अभियंता जीवन सदार, उपअभियंता सुनील चौधरी, समाज विकासतज्ज्ञ प्रदीप नितनवरे, पालिका आर्थिक तज्ज्ञ विपीन त्रिवेदी, नगररचनातज्ज्ञ अंकित साबळे, सल्लागार पीयूष हांडे व अन्य लाभार्थी उपस्थित होते.