नरखेड-अमरावती रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एकाचा मृत्यू

By admin | Published: April 8, 2016 12:07 AM2016-04-08T00:07:52+5:302016-04-08T00:07:52+5:30

नरखेड-अमरावती रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सुरू असून पुसल्यापर्यंत विद्युत ओव्हरहेड वायर टाकण्यात आले आहे.

Narkhed-Amravati Railway's overhead wire shock is the death of one | नरखेड-अमरावती रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एकाचा मृत्यू

नरखेड-अमरावती रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Next


वरूड : नरखेड-अमरावती रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सुरू असून पुसल्यापर्यंत विद्युत ओव्हरहेड वायर टाकण्यात आले आहे. हे वायर चोरीला जाऊ नये म्हणून कंत्राटदाराने रात्रीच्यावेळी विद्युत प्रवाह सुरू ठेवला होता. नेमके हेच वायर चोरण्यासाठी गेलेल्या युवकाचा विद्युतप्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला.
ही घटना ५ एप्रिल रोजी तालुक्यातील लिंगा बिटमध्ये घडली. संबंधित कंपनी किंवा रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड वायरमध्ये विद्युतप्रवाह सोडल्याची माहिती परिसरातील लोकांना दिली नसल्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, नरखेड-अमरावती रेल्वे लाईन विद्युतीकरणाचे काम जोरात सुरू आहे. विद्युत खांबावर रेल्वे इंजिनकरिता ओव्हरहेड तांब्याचे वायर टाकण्याचे काम पुसलापर्यंत पूर्ण झाले आहे. परंतु चोरट्यांनी या तारा चोरून नेण्याचा सपाटा लावल्याने रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने कंत्राटदाराने सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत या तारांमध्ये २२० व्होल्ट दाबाचा विद्युतप्रवाह सोडला होता. परंतु याची माहिती नसलेला मोवाड येथील ३० वर्षीय युवक रघुनाथ राजेराम शेखावत हा तार चोरण्याकरिता गेला असता त्याला विजेचा जबर धक्का बसला. यामध्ये तो जागीच ठार झाला.
घटनेची फिर्याद विजय श्रीरंग यादव (रा.मुंबई, ह.मु.वरूड) यांनी वरूड पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
घटनेचा तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शिंगाडे करीत आहेत.
विद्युतीकरण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच युवकाचे प्राण गेल्याची परिसरात चर्चा असून या कंत्राटदाराविरूध्द कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांद्वारे केली जात आहे. (तालुका प्रतिधिनी)

Web Title: Narkhed-Amravati Railway's overhead wire shock is the death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.