शासकीय वसाहतीत नळाच्या पाण्यात नारुसदृश जंतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:25 PM2018-09-09T22:25:45+5:302018-09-09T22:45:14+5:30
कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महापालिका क्षेत्रातील ३३ टक्के पाणीनमूने दूषित आढळून आल्याच्या अनुषंगाने अन्य भागात होणाºया पाणीपुरवठ्यामध्ये नारुसदृश जीव असण्याची शक्यता वाढली आहे.
नळाच्या पाण्यात नारू सदृश जीवजंतू आढळणे, ही बाब नागरिकांच्या आरोग्यास धोक्यात आणणारी आहे. कांतानगरात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच वास्तव्य आहे. रविवारी सकाळी आऊट हाऊस परिसरातील सार्वजनिक नळाच्या पाण्यात मोठ्या आकाराचा जीवजंतू दिसताच उपस्थित नागरिक भयभीत झाले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी नजिकच्या वसाहतीत नळाच्या पाण्यातून नारूसदृष्य जीव निघाला होता. त्यामुळे रविवारी पुन्हा नारुसदृश जीव दिसताच नागरिकांनी त्यास बॉटलीत कैद केले. पाण्याच्या या टाकीवरून अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. याासंदर्भात नागरिकांनी मजीप्रा व साबांविभागाकडे तक्रारी नोंदविल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कांतानगर सारख्या शासकीय वसाहतीत तब्बल अडीचशे क्वार्टर्स आहेत. सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांना एकाच टाकीवरून पाणी पुरवठा होत असून याशिवाय उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बंगल्यावरही पाणी पुरवठा होतो. ही बाब गंभीर असून, याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी वर्तविली आहे.
कांतानगरातील टाकीपर्यंत मजीप्राकडून पाणी पुरवठा केला जाते. ती टाकी ‘बीएन्डसी’च्या अधिकार क्षेत्रातील असल्याने त्यांच्याकडेच देखभाल आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवू.
- किशोर रघुवंशी,
उपविभागीय अभियंता, मजीप्रा.
पाण्याची टाकी शासकीय वसाहतीत आहे. पाण्यात जीवजंतू आढळल्याची माहिती नाही. मात्र, याबाबत संबधित अधिकाऱ्याला विचारणा करु. सोबतच महापालिकेलाही पत्र देऊ.
- सदानंद शेंडगे,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
दूषित पाण्यात नारू आढळून येतो, नारुसदृश जीवजंतू पाण्याद्वारे पोटात गेल्यास उलटी, अतिसार, काविळ, पोटदुखीसारखे आजार बळावतात. यासाठी पाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
- ऋषिकेश नागलकर, वैद्यकीय अधिकारी, इर्विन