नसीम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:28 PM2018-04-06T23:28:34+5:302018-04-06T23:28:34+5:30
पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
विधी सूत्रानुसार, ३ सप्टेंबर २०१४ रोजी एका व्यक्तीला फे्रजरपुरा हद्दीतील जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तपासदरम्यान मृत व्यक्ती अब्दुल नसीम अब्दुल सत्तार असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी मोहम्मद नईमोद्दीन याने त्याचा मित्र वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल यांना बोलावून जावई अब्दुल नसीमला मारून टाकल्याचे पुढे आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करून त्यांच्यविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. सरकारी पक्षातर्फे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला. मात्र, दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयात आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला नाही.
असा झाला युक्तिवाद
आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे सिद्ध होत आहेत. आरोपी मोहम्मद नईमोद्दीनकडे हत्या करण्याचा उद्देश होता, तो सिद्ध झाला. म्हणून आरोपींना शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तर घटनेच्या तारखेला आरोपी व मृतक हे एकमेकांच्या सोबत होते, हे सिद्ध झाले नाही. आरोपी मोहम्मद नईमोद्दीन यानेच मृतकाला दोन हॉटेल खरेदी करून दिले होते. ही बाब सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यात उलट तपासणीदरम्यान लक्षात आणून देण्यात आली. जर आरोपीने मृताला हॉटेल खरेदी करून दिले, तर त्याला मारण्याचे कोणतेही कारण नव्हते व इतर परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे सिद्ध झाले नाही, म्हणून आरोपींना निर्दोष सोडण्यात यावे, अशा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील परवेज खान यांनी केला.
आरोपी मोहसिन कमाल हा मुंबईचा रहिवासी असून, त्याचे व मृतकाचे कोणतेच वाद नव्हते. तो मुंबईहून अमरावतीत आला, ही बाब सिद्ध झाली नाही, असा युक्तिवाद अॅड. नरेंद्र दुबे यांनी केला. बचाव पक्षाचे वकील अॅड. परवेज खान यांना अनिल जयस्वाल, वसीम शेख व शहजाद शेख यांनी सहकार्य केले.