गुढीपूजनासाठी नटली अंबानगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:35 PM2018-03-17T22:35:06+5:302018-03-17T22:35:06+5:30
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुनिंबाच्या डाफळीने सजलेली गुढी दारोदारी उभारून नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुनिंबाच्या डाफळीने सजलेली गुढी दारोदारी उभारून नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. पारंपरिक वेशभूषेत नटून-थटून मराठमोळ्या पद्धतीने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरूणाईचा उत्साह यंदा ओसंडून वाहताना दिसतोय. याच उत्साहाचे पडसाद बाजारपेठेतही उमटले आहेत. बाजारपेठेतील लगबग शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.
मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र. उन्हाने यंदा कहर केलाय. चैत्रातच उकाडा असह्य होतोय. मात्र, असह्य तापमानातसुद्धा बाजारपेठेत गर्दी दिसून येत असून विधिवत गुढी पूजनाकरिता आवश्यक पूजा सामग्रीच्या खरेदीची गृहिणींची लगबग चालली आहे.
गुढीला पारंपरिक नऊवार, कोल्हापुरी नथ आणि इतर सौभाग्य साज चढवून नटविण्याचा भारीच उत्साह महिलांमध्ये दिसून येत पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या विविध संघटनांच्या सदस्यांची भगवे फेटे खरेदी करण्यासाठी गर्दी उसळत आहे. तरूणाईची गर्दी झाली आहे. गुढी पाडव्याची पहाट उगवणार ती पावित्र्य, आनंद, उत्साह आणि जल्लोषाची गुढी घेऊनच.