अमरावती विद्यापीठात ५ डिसेंबरपासून रसायनशास्त्राची राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:16 PM2019-11-28T12:16:35+5:302019-11-28T12:17:34+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारा तीन दिवसीय 'न्यु डायमेन्शन इन केमिस्ट्री अॅन्ड केमिस्ट्री एज्युकेशन आणि नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ केमिस्ट्री टीचर्स या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाद्वारा तीन दिवसीय 'न्यु डायमेन्शन इन केमिस्ट्री अॅन्ड केमिस्ट्री एज्युकेशन आणि नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ केमिस्ट्री टीचर्स (एन.सी.सी.टी. - २०१९)' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाला स्थापन होऊन तीस वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिषदेला विशेष महत्त्व आहे. ही परिषद असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स (ए.सी.टी.), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात तसेच सल्लागार समितीसह विविध समित्यांचे गठण परिषदेसाठी करण्यात आले आहे. रसायनशास्त्र विभागप्रमुख आनंद अस्वार हे परिषदेचे संयोजक आहेत.
आवर्ती सारणीला यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. रसायनशास्त्रातील नियम तथा ठराव करण्याचे अधिकार असणारी आंतरराष्ट्रीय युनियन ऑफ प्युअर आणि अप्लाइड केमेस्ट्री या संघटनेच्या स्थापनेससुद्धा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, याचे औचित्य साधून युनेस्कोने २०१९ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय आवर्ती सारणी वर्ष' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. आवर्ती सारणीचा विकास हे विज्ञानातील एक लक्षणीय योगदान राहिलेले आहे. आवर्ती सारणीमुळे आकाश विज्ञान, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, जैवविज्ञान, आणि नैसर्गिक विज्ञान इत्यादींच्या शाखांच्या वैज्ञानिक संकल्पना एकत्र गुंफलेल्या आहेत. १८६९ हे वर्ष रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव्ह यांच्या नियतकालिक शोधाचे वर्ष मानले जाते. २०१९ हे वर्ष सारणीच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त साजरे केले जात आहे.
भारतातून विविध नामवंत संस्थांमधील उत्कृष्ट व्याख्याते व नामांकित संशोधकांसह जवळपास तीनशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील. रसायनशास्त्र विषयातील विविध उपविषयांवर बीजभाषण, व्याख्याने, गटचर्चा, मौखिक समुदाय चर्चा होणार असून भित्तीपत्रक स्पर्धेचेसुद्धा या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या विषयांमध्ये रसायनशास्त्र अभ्यास व शिक्षण, नँनोकेमिस्ट्री, पॉलीमरचा पुनर्वापर, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोअॅनालिटीकल केमिस्ट्री, पर्यावरण रसायनशास्त्र आदी विषयांचा समावेश असून परिषदेचे उद्घाटन ५ डिसेंबर रोजी दृकश्राव्य सभागृहात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली थिरूवनंतपूरम येथील आयसर संस्थेचे संचालक जे.एन. मूर्ती यांचे हस्ते व डी.सी. डेका, गुवाहाटी, डी.व्ही. प्रभू, मुंबई व रोशनकुमार यादव (नेपाळ) यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. परिषदेचे संयोजक आनंद अस्वार, सचिव जागृती बारब्दे, कुलसचिव तुषार देशमुख यांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.