नॅशनल डॉक्टर डे : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा भार २८ क्लासवन डॉक्टरांवर
By उज्वल भालेकर | Published: July 1, 2024 12:10 AM2024-07-01T00:10:59+5:302024-07-01T00:11:18+5:30
आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज...
अमरावती : वाढत्या नवनवीन आजारांमुळे डॉक्टरांचे महत्त्व अधिक दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण मात्र अजूनही संपलेले नाही. जिल्ह्यात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय वगळता एकूण २२ शासकीय रुग्णालय असून याठिकाणी ४६ क्लासवन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात अजूनही ही पदे पूर्णपणे भरलेली नसून १८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे फक्त २८ क्लासवन डॉक्टरांवरच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धुरा असल्याचे चित्र आहे. १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील मुख्यबिंदू असलेल्या डॉक्टरांची संख्या वाढविण्यावर शासनाने अधिक भर देण्याची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या मानांकानुसार १ हजार लोकसंख्येमागे किमान एक डॉक्टर असणे अपेक्षित आहे;परंतु जिल्ह्याची लोकसंख्या पाहता शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना आजही शासकीय रुग्णालयाशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे अशा या गरीब रुग्णांसाठी डॉक्टर हे एखाद्या देवापेक्षा कमी नाहीत. आजही ग्रामीण तसेच मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात वेळेत डॉक्टर मिळत नसल्याने रुग्णांना आपले प्राण गमावण्याची वेळ येते. एकीकडे विज्ञानाच्या या युगामध्ये विविध आजारांवर मात करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसेच राज्य सरकारने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा मोफत केल्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे; परंतु रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची पदेच सरकारने अजूनही पूर्णपणे भरलेली नाहीत. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या इतर डॉक्टरांवरील कामांचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये क्लासवन अधिकाऱ्यांची ४६ पदे आहेत. त्यातील २८ पदे भरली असून १८ रिक्त आहेत तर क्लास टू डॉक्टरांची १६१ पैकी १२७ पदे भरली असून ३४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही ठिकाणी क्लासवन अधिकाऱ्यांच्या जागेवर क्लास टू अधिकाऱ्यांकडे प्रभारी चार्ज देण्यात आल्याचे दिसून येते.
इर्विनमध्ये सर्वाधिक पदे रिक्त
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) हे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांसाठीचे रेफर सेंटर आहे; परंतु याच ठिकाणी वर्ग एक डॉक्टरांची २२ मंजूर पदांपैकी ९ पदे आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार रिक्त पदांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
दंत शल्यचिकित्सकांची १५ पैकी ९ पदे रिक्त
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये दंत शल्यचिकित्सकांची एकूण १५ पदे मंजूर आहेत; परंतु यातील फक्त सहा पदेच भरण्यात आली असून ९ पदे रिक्त आहेत. डफरीन रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, धारणी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी उपजिल्हा रुग्णालय, धामणगाव ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, वरुड ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा ग्रामीण रुग्णालय, चुरणी ग्रामीण रुग्णालय येथील दंत शल्यचिकित्सकांची पदे रिक्त आहेत.