राष्ट्रध्वज सन्मान : प्लास्टिक तिरंगा बंदीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:49 AM2018-01-26T00:49:38+5:302018-01-26T00:50:19+5:30

दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात.

National flag honors: Court sealed on plastic banquet | राष्ट्रध्वज सन्मान : प्लास्टिक तिरंगा बंदीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

राष्ट्रध्वज सन्मान : प्लास्टिक तिरंगा बंदीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात. प्लास्टिक कागदाच्या तिरंग्याच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून अवमान झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे.
ध्वजसंहितेच्या कलम १ (२) ते १ (५) मध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची तरतूद आहे. प्लास्टिकच्या तिरंग्यावर बंदी असून कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी गृहविभाग पुढे सरसावला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर याविषयीजागृती करण्यात आली. राष्ट्रध्वज हे राष्ट्राबाबतच्या अभिमानाचे प्रतिक आहे.
देशाच्या खेळाडूने पदक मिळविले किंवा एखाद्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर तो आपल्या देशाचा ध्वज देऊन उभा राहतो. तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी शालेय गणवेश परिधान केलेली लहान मुले हाती राष्ट्रध्वज घेऊन धावतात. तेव्हा आनंद व समाधान वाटते. परंतु आनंद साजरा करीत असताना अनवधानाने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ शकतो, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान, विटंबना हे बोधचिन्ह व नावे (अनुसूचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा ठरतो, याविषयी ध्वजसंहितेमध्ये नमुद आहे.
अवमान रोखण्यासाठी शासनाच्या गृहविभागाने अशा सूचना जिल्हा, तालुका पातळीवर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अशासकीय संस्था, विद्यार्थी, स्थानिक केबल आॅपरेटर व प्रसार माध्यमांच्या मदतीने जनजागृती करण्याच्या सूचना १४ जून २०१४ च्या परिपत्रकान्वये देवूने अनुपालन निर्देश दिले आहेत.
ध्वजसंहितेत प्लास्टिकचा तिरंगा नमूद नाही
वापरातील प्लास्टिक नष्ट होत नाही. ते बरेच दिवस पडून राहते. ध्वजसंहितेच्या कलम २.२ (७) मधील प्रयोजनासाठीच कागदी तिरंगा वापरता येतो. प्लास्टिक तिरंग्याच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर करू नये, अशा गृहविभागाच्या सूचना आहेत.
अशी लावावी विल्हेवाट
खराब झालेले, धूळ लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून, शिवून बंद करावे व ते राष्ट्रध्वज सूर्यास्त किंवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावेत व पूर्ण जळेपर्यंत सर्वांनी तेथेच उभे राहावे.
जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे सुपूर्द करावेत
राष्ट्रीय सण व राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानुसार खराब झालेले, माती लागलेले तिरंगेञमैदानात, रस्त्यावर व कार्यक्रमस्थळी पडलेले असतात. हे तिरंगे गोळा करून जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे सुपूर्द करण्याचे अधिकार तालुका, जिल्हास्तरावर नेमलेल्या अशासकीय यंत्रणेस देण्यात आले आहेत.
व्यावसायिकदृष्ट्या वापर हा अवमानच
राष्ट्रध्वजाचा सन्मान एक दिवसासाठी नव्हे, तर निरंतर कायम असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज फाटू नये, वाहनांवर लावल्यानंतर तो उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. शाळेत जाताना मुलांच्या हाती प्लास्टिकचा, कागदाचा तिरंगा देऊ नये. राष्ट्रध्वजावर पाणी टाकणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे, व्यावसायिकदृष्ट्या वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान समजला जातो. त्यामुळे नागरिकांनी याची विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: National flag honors: Court sealed on plastic banquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.