राष्ट्रीय महामार्गाचे काम पंधरवड्यापासून बंद,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:25+5:302021-06-16T04:17:25+5:30
वाहतुकीला अडचण; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नागरिकांमध्ये नाराजीचा सूर चांदूर बाजार : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ३५३ या रस्त्याचे ...
वाहतुकीला अडचण; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
चांदूर बाजार : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ३५३ या रस्त्याचे बांधकाम मुख्य बाजारपेठेमध्ये सुरू आहे. मात्र, सदर काम गेल्या पंधरवड्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीला मोठी अडचण होत आहे. या अर्धवट खोदकाम करून सुरू असलेल्या बांधकामामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने जयस्तंभ चौक ते नगर परिषद विद्यालयापर्यंतचा रस्ता कंत्राटदाराने एकीकडून खोदून ठेवण्यात आला आहे, तर खड्ड्यात फक्त कच्चे काँक्रीट टाकण्यात आले होते. मुख्य बाजारपेठेमध्ये असलेला हा रस्ता यच जी इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीतर्फे बांधकाम केले जात आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे बांधकाम पूर्णतः बंद आहे.
रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता कंत्राटदाराकडून एकाच बाजूने दोन्ही रस्त्यांची वाहतूक सुरू आहे. मुख्य बाजारपेठेमध्ये सुरू असलेल्या या बांधकामामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होताना दिसून येत आहे. या महामार्गावर शासकीय कार्यालये, शाळा, बँका तसेच ग्रामीण रुग्णालयसुद्धा आहे. याच मार्गावर मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारपेठ भरते. सध्या लॉकडाऊन असले तरी रस्त्यावर वाहतूक, बाजारपेठेत दुकानांची संख्या व गर्दी कमी होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही प्रमाणात का होईना वाहतूक तसेच बाजारपेठ खुली झाल्याने बाजारात चांगलीच गर्दी होत आहे.
यासोबतच खरीप पेरणीसाठी शेतकरी बियाणे, खत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येत आहेत. अशात या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसून येत आहे. मात्र, सदर काम हे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात असलेल्या दुकानदारांना व्यवसाय करताना मोठी अडचण येत आहे. खोदकाम झालेल्या भागातील दुकानात जाण्या - येण्यासाठी असलेला रस्ता बंद पडल्याने परिसरातील नागरिकांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे इंचा ही कंत्राटदार कंपनी काम करण्यास टाळाटाळ करत आहे. सदर काम तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.